गडचिरोलीतील एटापल्लीमधील पेदी – कोटमीच्या जंगलात चकमकीत ठार झालेल्या सर्व १३ नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात गडचिरोली पोलिसांनी यश आले आहे. या सर्व १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

आजच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक चार दलमचा विभागीय समिती सदस्य तथा जहाल नक्षलवादी सतिश उर्फ अडवे देवू मोहंदा याचा समावेश आहे. त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. कसनसूर दलमची नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी हिचेवर ६ लाख, किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे ४ लाख, कसनसूर दलमचा उपकमांडर रूपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे याच्यावर ६ लाखाचे बक्षीस होते, सेवंती हेडो हिचेवर २ लाख, किशोर होळी याच्यावर २ लाख, क्रांती उर्फ मैना उर्फ रीना माहो मट्टामी हिच्यावर २ लाख, गुनी उर्फ बुकली धानू हिचामी हिच्यावर ४ लाख, रजनी ओडी २ लाख, उमेश परसा याचेवर ६ लाख, सगुना उर्फ वासंती उर्फ वत्सला लालू नरोटे हिच्यावर २ लाख, सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम हिचेवर ६ लाख, तर रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नु कारामी याच्यावर २ लाखाचे बक्षीस होते.

१३ नक्षल्यांचा खात्मा : जवानांच्या अभिनंदनासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोलीत

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता.

मोठी बातमी! गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून १३ नक्षलवादी ठार

कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्षलवादी तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती अशी माहिती आहे. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती.