07 March 2021

News Flash

गडचिरोलीत आणखी तीन जहाल नक्षलवाद्यांची शरणागती

नक्षली नेत्यांनीच खंडणीखोरी सुरू केल्याने जीवाच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर सहा लाखांचे बक्षीस असलेल्या एरिया अ‍ॅक्शन टीमचा सदस्य ऊंगा उर्फ लक्ष्छुराम पांडू वड्डे, बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी व कुमली उर्फ शांती शंकर कवडो या तीन नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. कधी काळी वैचारिक चळवळ म्हणून डंका पिटणाऱ्या नक्षली नेत्यांनीच खंडणीखोरी सुरू केल्याने जीवाच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवादी मोठय़ा संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. गडचिरोली पोलीस दलातर्फे नवजीवन योजना राबविण्यात आल्याने नक्षल सदस्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहन मिळाले. तसेच मागील वष्रेभरात झालेल्याआत्मसमर्पणाबरोबरच चालू वर्षीही ओघ सुरू आहे.

वरिष्ठ नक्षल सदस्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने व पोलीस दलाने त्यांचे पुनर्वसन घडवून आणल्याने नुकतेच चालू आठवडय़ामध्ये पेरमिली एरिया अ‍ॅक्शन टीमचा सदस्य ऊंगा उर्फ लच्छूराम पांडू वड्डे (२५) तसेच चार लाखांचे बक्षीस असलेली प्लाटून दलम क्रमांक ७ ची सदस्य कुमली उर्फ शांती शंकर कवडो (२२) व दोन लाखांचे बक्षीस असलेली भामरागड दलम सदस्य बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी (१९) अशा एकूण तीन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

चालू वर्षांत मार्च महिन्यात नक्षल विभागीय समितीच्या सदस्यासह एक कमांडर, विविध दलमच्या २४ नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण करून चळवळीला जबर हादरा दिला आहे. यावर्षी आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन जोडप्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी वैविध्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवून जिल्हय़ातील नागरिकांची मने जिंकली आणि जनतेचा विश्वास संपादन केला.

नक्षल्यांनी लाकूड डेपो जाळला

सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी मध्यरात्री घोट येथील वन विभाग व जंगल कामगार सहकारी संस्थेच्या लाकूड डेपोला आग लावली. यात सुमारे आठशे बिटातील लाकडे जळून खाक झाली असून जंगल कामगार संस्था व वन विभागाचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घोट पोलिस ठाण्यापासून पाऊण किलोमीटरवर असलेल्या डेपोत मध्यरात्री आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी लाकडांना आग लावली. यात भूमखंड जंगल कामगार सहकारी संस्थेचे २१४, फुलबोडी संस्थेचे २२, कोटगूल संस्थेचे २२५ अशा एकूण ४६१ बिटातील लाकडे जळून खाक झाली. पहाटे वन विभागाचे टँकर व गडचिरोली येथून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले. परंतु तोपर्यंत बरीच लाकडे जळून खाक झाली होती. घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रके टाकली होती. त्यात ९ मे रोजी हुर्रेकसा येथील चकमकीत ठार झालेली वरिष्ठ नक्षलवादी रहिता हिच्या हत्येचा निषेध म्हणून ३१ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. मात्र लाकडे का जाळली, याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 2:31 am

Web Title: gadchiroli three naxals surrender to police
टॅग : Gadchiroli
Next Stories
1 ताडोबात प्रथमच विक्रमी व्याघ्रदर्शन
2 लोक बिरादरी प्रकल्पाकडून ‘मामा’ तलावाचे खोलीकरण
3 टिमटाळयाला जलनियोजनाची दिशा!
Just Now!
X