मंगळवारी बॅंका सुरू झाल्या असल्या तरी  नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात जुन्या नोटा बदलण्यासाठी अतिदुर्गम भागातील आदिवासींना २५ ते ५० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे, काही गावांमध्ये तर हा निर्णय पोहोचला की नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

येथील आदिवासी घरीच पैसे ठेवतात. त्यांना बॅंकेची किंवा बॅंकेच्या व्यवहाराची अजिबात सवय नाही. त्यामुळे आता ते ५०० रुपयाची नोट बदलण्यासाठी २५ ते ५० किलोमीटरची पायपीट करीत आहेत. या जिल्ह्य़ात १८०० गावे असून विविध बॅंकांच्या केवळ १२० शाखा आहेत. त्यातही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ५५ शाखा आहेत. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरची, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये तर राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकच शाखा असल्याने या नोटा बदलायच्या कशा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुका गडचिरोलीपासून २०० कि.मी.वर आहे. तेथे बॅंक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा आहे. पातागुडम, कोरला व झिंगानूर या परिसरातील गावकऱ्यांना नोट बदलण्यासाठी सकाळी आठ वाजता निघावे लागते. चार-पाच तासाच्या पायपिटीनंतर तो बॅंकेत पोहोचतो. तेथेही लांबच लांब रांगा. त्यात ३-४ तास उभे राहिल्यावर पुन्हा पाय तुडवत परतावे लागत लागतो. यात अंधार पडल्यानंतर रस्त्यात नक्षलवादी किंवा लुटारूंची भीतीही आहे.

केवळ सिरोंचाच नाही, तर नक्षलवाद्यांचा गड असलेल्या धानोरा व एटापल्ली तालुक्यातही गावकरी ५० कि.मी.ची पायपीट आणि नक्षलवाद्यांच्या भीतीनेही नोटा बदलण्यासाठी निघत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. मग गावातील ८-१० जण गटा गटाने बॅंकेतून नोटा बदलून आणत आहेत. या जिल्ह्य़ात काही गावे तर इतकी दुर्गम आहेत की तेथे पोहोचणेच कठीण, त्यामुळे अशा गावांपर्यंत नोटा बदलण्याचा संदेश तरी गेला की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कोरची या नक्षलग्रस्त दुर्गम तालुक्यात राष्ट्रीयीकृत बॅंकेची केवळ एकच शाखा, तर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कोडगुल, बेतकाठी व कोरची, अशा तीन शाखा आहेत. मात्र, मध्यवर्ती बॅंकेला नोटा स्वीकारता येणार नाही, असे आदेश असल्याने आदिवासींची पंचाईत झाली आहे. कारण, बहुसंख्य आदिवासींची खाते याच जिल्हा बॅंकेत आहेत. त्यात कोरची तालुक्यात १२० गावे, २९ ग्राम पंचायती व एक नगर पंचायत आहे. या तालुका मुख्यालयापासून बहुतांश गावे ५० ते ६० कि.मी.वर असल्याने गावकऱ्यांना पायपीट करावीच लागत आहे. किमान जिल्हा बॅंकेत तरी नोटा बदलण्याची सोय करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

बॅंक खात्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

नक्षलवाद्यांचा पैसा आदिवासी किंवा अन्य कुणाच्या नावावर जमा होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक बॅंक खात्यावर लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले आहेत. नक्षलवादी पैसा हा जंगलात जमिनीत गाडून ठेवतात किंवा गावातील एखाद्या विश्वासपात्र व्यक्तीकडे असतो. मात्र, आता नोटाबंदीनंतर हा पैसा त्यांच्याही कामाचा नाही. त्यामुळे ते यासाठी स्थानिकांचा आधार घेतील, हे लक्षात घेऊनच पोलिसांनी बॅंक खात्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.