01 October 2020

News Flash

गडचिरोली : नक्षलींच्या भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षकासह जवान शहीद

तीन जवान गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अलदंडी-गुंडूरवाहीच्या जंगलात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०) व सी 60 पथकाचे शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी ठार झाले असावेत अशी शक्यता गडचिरोली पोलीस दलाने व्यक्त केली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने यांना नुकतेच पोलीस महानिरीक्षक पदकाने गौरविण्यात आले होते.

नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून लगेच गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले, तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळावर चकमक सुरु आहे. शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 3:53 pm

Web Title: gadchiroli two jawans martyred three injured in naxal attack msr 87
Next Stories
1 संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध, ट्विटरवरुन दिलं उत्तर
2 शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात, सात जखमी
3 महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती
Just Now!
X