‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद लावली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग अनेक जिल्हा परिषदेत अयशस्वी झाला. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांची निवड झाली. मागील अडीच वर्षे गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि आदिवासी विद्यार्थी संघटना अशी युती होती. त्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद आदिवासी विद्यार्थी संघटनेकडे, बांधकाम सभापतीपद राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते.

५१ सदस्य असणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न फसला आहे. चार सदस्यही फुटल्यामुळे भाजपाला गडचिरोलीमध्ये मोठा धक्का बसल्याच्या चर्चा आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये भाजपाच्या चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.

गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी भाजपाबरोबर तर काँग्रेस आदिवासी विद्यार्थी संघटनेबरोबर गेल्याने सत्तेची समिकरणे बदलली होती. अखेरीस अध्यक्षपदी अजय कंकडालवार २२ विरुद्ध २९ मतांनी विजयी झाले. तर मनोहर पाटील पोरेटी यांची २२ विरुद्ध २९ मतांनी उपाध्यक्षपदी निवड झाली.

पक्षनिहाय सदस्य

भाजप – २०
काँग्रेस – १५
आदिवासी विद्यार्थी संघ – ०७
राष्ट्रवादी काँग्रेस – ०५
अपक्ष – ०४