गडहिंग्लज शहर हद्दवाढीची उद्घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. या हद्दवाढीमुळे बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमधील सुमारे ६.२५ चौरस किलोमीटर पैकी ४.४ चौरस किलोमीटरचा परिसर गडहिंग्लज नगरपरिषदेला जोडला जाणार आहे. या निर्णयाचे गडहिंग्लज परिसरात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.

गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीचा विषय भिजत घोंगडे बनला आहे. बड्याचीवाडीचा परिसर नगरपालिकेत सामावून घेऊन शहराची हद्दवाढ करावी आणि बरेच दिवस प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा याबाबत समरजितसिंह घाटगे हे गेली सहा महिने प्रयत्नशील होते. याबाबत गडहिंग्लज हद्दवाढ कृती समिती शिष्ठमंडळासह शासनाकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत होते. शासनाने हद्दवाढीची उद्घोषणा केलेने सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे गडहिंग्लज शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे, असा दावा घाटगे यांनी केला.

समरजितसिंह घाटगेंचा पाठपुरावा

गडहिंग्लज शहराच्या सभोवती असणाऱ्या २५ ते ३० वसाहती बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीत येतात. बड्याचीवाडी हे मूळ गाव गडहिंग्लज शहरापासून चार किमी अंतरावर आहे. हा भाग हा गडहिंग्लज शहराच्या हद्दीला लागून असल्याने या भागातील नागरिकांना विविध कामांसाठी शहरातच यावे लागते. हा भाग जिल्हा परिषद हद्दीत असल्याने या भागातील वसाहतीत पाणी, गटार, स्वच्छता, दिवाबत्ती इत्यादी नागरी सुविधांची व्यवस्था करणे, पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे बड्याचीवाडीचा काही भाग नगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी होती.

यासाठीच घाटगे यांच्या पुढाकाराने एक महिन्यापूर्वी मुंबई येथे बैठक पार पडली होती. त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ते गेले महिनाभर कोल्हापूर जिल्हापरिषद ,जिल्हाधिकारी ,नगरविकास खाते यांच्याशी संपर्क ठेऊन होते. या कार्यालयांच्या शिफारसींसह प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला होता. आता मुख्यमंत्री फडवणीस यांनी हद्दवाढीची उद्घोषणा करून घाटगे यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला.