मुखी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी शुक्रवारी शहरात दाखल झाली. भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर यांनी पालिकेच्या वतीने पूजा करून वारकऱ्यांचे स्वागत केले.
तालुक्यातील उपळा (मा.) येथून पहाटे ५ वाजता पालखीचे उस्मानाबादकडे प्रस्थान झाले. सकाळी आठच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. तेरणा महाविद्यालय येथे नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर व मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी स्वागत करून दर्शन घेतले. ज्ञानेश्वर मंदिर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा न्यायालय, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, देशपांडे स्टँड, नेहरू चौक, काळा मारूती चौक, टपाल कार्यालयमाग्रे पालखी लेडीज क्लबच्या मदानावर मुक्कामी दाखल झाली. जिल्हा न्यायालय परिसरात विधिज्ञांनी स्वागत करून वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, फळे, खाद्यपदार्थ वाटप केले. नगर परिषदेने पालखी मार्गावर स्वच्छता करून रस्त्याच्या दुतर्फा जंतुनाशक पावडरची फवारणी केली होती. सायंकाळी पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत वारकऱ्यांचे भजन, कीर्तन, हरिनामाचा जागर सुरू होता. उद्या (शनिवार) पालखी वडगाव (सि.)कडे मार्गस्थ होणार आहे.
शहरातील तांबरीचा राजा गणेश मंडळातर्फे िदडीतील वारकऱ्यांना प्रवासात उपयोगी पडणाऱ्या साहित्याच्या ७०० कीटचे वाटप पोलीस अधीक्षक अभिषेख त्रिमुखे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक डी. एम. शेख, सहायक निरीक्षक किशोर मानभाव, मंडळाचे अध्यक्ष अविनाश हंगे, प्रशांत कोनार्डे, शार्दुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.