– धवल कुलकर्णी

महाराष्ट्र म्हणजे देवांची आणि संतांची भूमी. त्यामुळे इथे यात्रा उत्सव उरूस याला काही कमी नाही… पण तुम्ही ऐकून अचंबित व्हाल की या राज्यात एक असे सुद्धा गाव आहे जिथे महात्मा गांधींच्या नावाने एक यात्रा भरते आणि त्याला एक मोठा सामाजिक संदर्भ सुद्धा आहे. ही यात्रा भरते लातूर मधल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या उजेड गावामध्ये आणि त्याला म्हणतात ‘गांधीबाबा यात्रा.’ राष्ट्र पित्याच्या नावावरचा हा उपक्रम १९५२ पासून राबवला जातो, असे सरपंच हमीद पटेल यांनी सांगितले. हे यात्रेचे ६८ वे वर्ष आहे.

ग्रामस्थ अशी आठवण सांगतात की एकेकाळी गावामध्ये शंभू महादेवाच्या आणि एका मुसलमान पिराच्या नावाने यात्रा होत्या. त्याच्यामुळे हिंदू आणि मुसलमान यांमध्ये झगडा होऊन वैमनस्य निर्माण व्हायचं. त्यामुळे गावातील काही ज्येष्ठ मंडळी जशी स्वातंत्र्यसैनिक शिवलिंग स्वामी, चांद पटेल, अहमद पटेल, स्थानिक शिक्षक रामराव रेड्डी, गोविंदराव मास्तर आणि पैलवान भीमराव रेड्डी यांनी असं ठरवलं की एक आगळीवेगळी यात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सुरु करण्यात यावी.  त्यावेळेला निजाम स्टेट मध्ये असलेल्या या गावाचे नाव हिसामाबाद होते. आज उजेड नाव असलेल्या या गावात साधारणपणे ८,००० गावकरी आहेत. गाव लातूर पासून २५ किलोमीटर लांब आहे.

त्याला दुसरा आणि फार महत्त्वाचा संदर्भ सुद्धा होता. १९४८ मध्ये केंद्र सरकारला ऑपरेशन पोलो ची सुरुवात करावी लागली याचं कारण असं होतं हैदराबादच्या निजामाने आणि अत्यंत कट्टरवादी असलेल्या रझाकारांनी हैदराबाद राज्य भारतामध्ये विलीन करायला विरोध केला होता. हैदराबादची बहुसंख्य प्रजा हिंदू होती तर राज्यप्रमुख आणि स्थानिक अमीर-उमराव हे मुसलमान. त्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कालखंडामध्ये रझाकारांनी प्रजेवर केलेले अनन्वित अत्याचार अजुनही मराठवाड्यातली ज्येष्ठ मंडळी अंगावर काटा आणून सांगतात. ऑपरेशन पोलो नंतर हिंदू आणि मुस्लिम समाजा मधला तणाव अधिक वाढला होता आणि त्यामुळे सर्वधर्मसमभावाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या महात्मा गांधींच्या नावाने यात्रा सुरू करून कुठेतरी या मंडळींना हा तणाव शांत करायचा होता.

२३ जानेवारी रोजी महात्मा गांधींचा अर्ध पुतळा बसवण्यात येतो आणि ग्रामस्वच्छता अभियानासोबत यात्रेची सुरुवात होते. दोन दिवस जनावरांसाठी आरोग्य शिबिर आणि पशू प्रदर्शन आयोजित करण्यात येते. गणतंत्र दिवस हा प्रभात फेरीने आणि झेंडावंदनाने गाजतो आणि संध्याकाळी आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जानेवारी २७ रोजी शाहीर, भजन मंडळी आणि स्थानिक युवक आपली कला सादर करतात. तीस तारखेला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचा अर्धपुतळा पुन्हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवण्यात येतो. यात्रेमध्ये कुस्त्यांच्या फडांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. यात मराठवाडा व अन्य ठिकाणचे मल्ल येऊन भाग घेतात.

दसरा-दिवाळी सारखा सण असावा त्या प्रमाणे यात्रेमध्ये उजेडचे ग्रामस्थ जे अन्य ठिकाणी स्थायिक झाले आहेत ते गावामध्ये आपली हजेरी लावतात, असे सरपंच हमीद पटेल यांनी सांगितले.