आयुर्वेद ही देशाची आरोग्य उपचार पध्दत व्हावी, असे सांगून गेलेल्या महात्मा गांधींच्याच अनुयायांनी आयुर्वेद चिकित्सालय कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्टय़ा फोयदेशीर नसल्याचे कारण देत घेतला आहे.

स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या नागपूरच्या कांॅग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी आयुर्वेद ही देशाची उपचारप्रणाली व्हावी, असा विचार मांडला होता. या उपचार पध्दतीवर त्यांचा असलेला नितांत विश्वास, हे त्यामागील एक प्रमुख कारण होते. मात्र, त्यांच्याच नावे चालणाऱ्या सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील आयुर्वेद चिकित्सालय बंद करण्याचा निर्णय कस्तूरबा हेल्थ सोसायटीने घेतला आहे. या केंद्राचे प्रमुख डॉ.बाबू रमेश व त्यांच्या सहाय्यक प्राध्यापकास बरखास्त करून गाशा गुंडाळण्यास सांगण्यात आले. गत २६ वर्षांंपासून या केंद्राचे प्रमुख असलेले डॉ.बाबू यांनी दिल्लीच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेचे संचालकपद भूषविलेले आहे. महिन्याकाठी १५ ते २० रुग्ण या केंद्रात उपचारार्थ येत होते. त्यावर अल्प खर्च व्हायचा. मात्र, अत्याधुनिक होण्याची वाटचाल करीत असल्याचा दावा करणाऱ्या संस्थेने या केंद्रच बंद करून गांधीविचारांनाच मुठमाती दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

गांधी प्रेरणेने १९४४ ला केंद्राची स्थापना झाली. पुढे गांधीजींच्या खाजगी डॉक्टर व मानसकन्या म्हणून परिचित डॉ.सुशीला नायर यांनी त्या केंद्रात वैद्यकीय शिक्षणमंत्री असतांना सेवाग्रामला देशातील पहिल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. आता ही संस्था १०० वैद्यकीय पदवी प्रवेश क्षमता व ७८० खाटांसह कार्यरत आहे.

नवनवा विस्तारही होत आहे, पण खादीवस्त्र व गांधीविचार हाच एकूण कार्याचा आधार आहे. या पाश्र्वभूमीवर आयुर्वेद चिकित्सालयाचे बंद होणे दुदैवी मानले जाते.

बरखास्त करण्यात आलेले डॉ.बाबू रमेश यांनी याला दुजोरा दिला. याविषयी आपण एक निवेदन संस्थेला दिल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थाध्यक्ष धीरूभाई मेहता म्हणाले की, केंद्र बंद करण्यात आले, हे खरे आहे. मात्र, याविषयी विचारविनिमय सुरू आहे, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्यात नकार दिला. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गांधीजींना आयुर्वेद उपचारप्रणाली प्रिय म्हणून त्यांच्याच नावे असलेले देशातील एकमेव आयुर्वेद महाविद्यालय सावंगीत मात्र पूर्ण क्षमतेने सुरू आहे.