लोकसभेच्या नगर मतदारसंघात पाच व शिर्डी मतदारसंघात आठ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा उद्या (बुधवार) शेवटचा दिवस आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी मंगळवारी मोठय़ा शक्तिप्रदर्शनाने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मतदारसंघातील आमदार अनिल राठोड, विजय औटी, शिवाजी कर्डिले आणि राम शिंदे यांच्यासमवेत एक आणि नंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या समवेत पुन्हा एक असे दोन अर्ज गांधी यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे दाखल केले. याच मतदारसंघातून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा लोकशासन पार्टीचे प्रमुख बी. जी. कोळसे पाटील (अपक्ष), शिवाजी डमाळे (भारतीय नौजवान पार्टी), अनिल घनवट (आप व अपक्ष), डॉ. श्रीधर दरेकर (अपक्ष) यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले तसेच भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी अशोक गायकवाड यांनी शिवसेना व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे दाखल केले. याशिवाय संदीप भास्कर घोलप (अपक्ष), संतोष रोहम (अपक्ष), महेंद्र शिंदे व माधव त्रिभुवन (दोघेही बसाप), रवींद्र शेंडे आणि काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आज पुन्हा अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (बुधवार) शेवटचा दिवस असून शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार सदाशिव लोखंडे, नगर मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार दीपाली सय्यद या प्रमुखांचे उमेदवारी अर्ज अद्यापि राहिले आहेत. ते उद्याच दाखल होतील.