अजून वेळ गेली नाही, चांगला निर्णय होईल – खा. गांधी

डॉ. सुजय विखे यांना पक्षप्रवेश देऊन त्यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने खा. दिलीप गांधी यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या गांधी यांच्यावर अन्याय करणारा निर्णय पक्षश्रेष्ठींनी तातडीने बदलावा, अशी मागणी केली आहे. गांधी समर्थकांच्या आज, बुधवारी झालेल्या मेळाव्यात विखे यांच्या निषेधाच्या, तर गांधी यांच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच पक्षश्रेष्ठींचाही निषेध करण्यात आला. खा. गांधी यांनी मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण मुख्यमंत्री व केंद्रातील नेत्यांची भेट घेणार आहोत, अजूनही आपल्यासाठी चांगला निर्णय होऊ शकतो, थोडे थांबा, चार दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

गांधी समर्थक कार्यकर्त्यांची आज त्यांच्या कार्यालयाच्या आवारात बैठक झाली. त्यात कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या व नंतर खा. गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. गांधी यांनी आता शांत बसू नये, तातडीने निर्णय घ्यावा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. नगर अर्बन बॅंकेचे संचालक अजय बोरा म्हणाले, की राजकीय वलय असलेल्या विखेंसाठी निष्ठावानांवर पक्षाने अन्याय केला आहे. खा. गांधी यांनी पक्ष सोडला तर जिल्ह्यातून पक्ष शून्यावर येईल. देशात जैन समाजाचा एकच खासदार आहे, मात्र त्याच्यावरही अन्याय होत आहे, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल. राजकीय लाभासाठी विखे पक्षात आले. बाळासाहेब कोळगे म्हणाले,की खा. गांधी यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवला, विकास कामे केली. मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आश्रु टकले म्हणाले, २००४ मध्ये अशाच पद्धतीने गांधी यांची उमेदवारी पक्षाने कापली होती. त्या वेळी कार्यकर्ते  शांत राहिले, आता मात्र शांत बसण्याची वेळ नाही. गांधी यांनीही आता थांबू नये, योग्य निर्णय घ्यावा. राम पोटफोडे म्हणाले,की गांधी यांच्या विकास कामामुळेच आपण कम्युनिस्ट पक्ष सोडून भाजपचे काम करु  लागलो.

पक्षाने फेरविचार करुन गांधी यांनाच उमेदवारी द्यावी. युवा मोर्चाचे उमेश साठे म्हणाले,की उत्तरेतील उपऱ्यांची निष्ठावानांनी पालखी कशासाठी उचलायची? पक्षाने घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे. प्रसंगी युवा मोर्चाचे पदाधिकारी राजीनामे देतील.  बाळासाहेब पोटघन म्हणाले, सुजय विखे यांच्या मतदारसंघातील सभा ‘प्रिपेड’ आहेत. सभांच्या ठिकाणी पैशांचा धूर, मटणाच्या व दारु च्या पाटर्याही झाल्या. युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे घेऊन जाण्याची विखे यांची प्रवृत्ती आहे.

विक्रम बारवकर यांनी, विखे घुसखोर आहेत, दोन वर्षांंपासून ते भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत, अशांनाच पक्षात घेऊन व उमेदवारी देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

मिलिंद भालसिंग, कासम शेख, आदिनाथ मासाळकर, अप्पासाहेब सुकासे, कमलेश गांधी, संतोष पुरोहित, निखिल मंडलेचा, कुंतीलाल चोरिडया, अनिल संचेती, योगेश फुलारी, कैलास गर्जे, शाकीर सय्यद, देवराव वाकडे, बापूसाहेब ढवळे आदींसह मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.