|| हर्षद कशाळकर

गणेशमूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ

कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेशमूíतकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ३० लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातून मागणी होत असते. पेणमध्ये गणपती बनवणारे ४५० लहान-मोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. देश-विदेशात या गणेशमूर्तीची विक्री केली जाते. यातून जवळपास ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते. यावर्षी देखील पेणमधून ३६ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठवण्यात आल्या आहेत. यावर्षी अमेरिका, इंग्लड, दुबई, बँकॉक, ऑस्ट्रेलिया, मॉरेशिअस येथे पेणच्या गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत.

दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतींमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. यावर्षी मात्र ही दरवाढ २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. वाहतूक खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. याचा अतिरिक्त फटका गणेशमूर्तीच्या किमतीवर झाला आहे. गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग यांसारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

दुसरीकडे कुशल कारागिरांची कमतरता ही पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायासमोरील मोठी अडचण असते. त्यामुळे चांगली मजुरी देऊ न कारागीर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना दिवसाला चारशे ते पाचशे रुपये घेतात. याचा एकत्रित परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवर झाला आहे.

‘दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असते. मात्र यंदा कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठी वाढ आणि कुशल कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. वाहतूक खर्चही वाढला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे.’   – श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेशमूर्तीकार संघटना

‘ गणेशमूर्ती बनवणाऱ्या कार्यशाळांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे कुशल कारागिरांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे जास्त मोबदला देऊन कुशल कारागिरांना ठेवावे लागत आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ करणे क्रमप्राप्त आहे.’     –  नीलेश समेळ