|| हर्षद कशाळकर, भाग्यश्री प्रधान

गतवर्षीपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) गणेशमूर्तीना मुक्त करण्यात आले असले तरी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील कर कायम असल्याने यंदाही गणेशमूर्तीच्या किमतीत पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीकडे ग्राहकांचा ओढा वाढत असला तरी, त्यांचे दर तुलनेने जास्त असल्याने गणेशभक्तांना यंदा गणरायाची आराधना करण्यासाठी जास्त किंमत चुकवावी लागत आहे.

कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आदी कारणांमुळे  गणेशमूर्तीच्या निर्मितीखर्चात यंदा वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मूर्तीच्या दरांवर झाला आहे. छोटय़ा मूर्तीची किंमत ३००-४०० रुपयांनी वाढली असून मोठय़ा मूर्तीची किंमत ५ ते ६ हजारांपर्यंत वाढली आहे. असे असले तरी गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ३६ लाख गणेशमूर्ती देशविदेशांत रवाना झाल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशांतून मागणी होत असते. पेणमध्ये गणपती बनवणाऱ्या ४५० लहान-मोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ लाख गणेशमूर्त्यां बनवल्या जातात. देशविदेशांत या गणेशमूर्तीची विक्री केली जाते. यातून जवळपास ६० ते ७० कोटींची उलाढाल होते.

गणेशमूर्तीना वस्तू व सेवा कर लागणार अथवा नाही यावरून गणेश मूर्तिकारांमध्ये वर्षभर संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता गणेशमूर्तीवर जीएसटी लागणार नसल्याचे जाहीर झाल्याने मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी स्पष्ट केले . मात्र मुर्ती जरी जीएसटी मुक्त केली असली तरी कच्चा मालावर जीएसटी लागु केल्याने मुर्तीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे मुर्तीकारांचे नुकसान होत असून ग्राहकांना देखील गणेशाची मुर्ती महाग मिळत असल्याची माहिती  मंगलमुर्ती डॉट कॉमचे महेश कदम यांनी दिली.

कच्च्या मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून कुशल कारागिरांना दिवसाला पाचशे ते हजार रुपये मजुरी द्यावी लागते. वाहतूक खर्चही वाढल्याने यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत नेहमीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.      – श्रीकांत देवधर, अध्यक्ष, पेण गणेश मूर्तिकार संघटना

बालगणेशना पसंती

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशाच्या बालरूपाचे वर्णन करणाऱ्या मूर्तीची अधिक विक्री होत असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. यामध्ये भरपूर मोदक खाणारा गणपती, गाईचे दूध काढणारा बालगणेश, कृष्णाचा हात धरून त्याला ‘खेळायला चल’ असा हट्ट करणारा गणेश तर हत्तीमध्ये बनविलेली गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी पाहावयास मिळत आहे. मारुतीच्या मांडीवर बसलेला गणराय आणि उंदीरमामाच्या हातात असणाऱ्या आणि ढोलावर बसून ढोल वाजवणाऱ्या श्रीगणेशानेदेखील ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

कारण काय?

गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग यासारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत या मातीचे भाव किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वधारले आहेत. तसेच रंगाचे भाव वाढले आहेत, असे मुर्तीकार नाना कडू यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.