30 September 2020

News Flash

गणेशोत्सव, टिळक आणि ब्रह्मदेश..

म्यानमार भारताच्या उत्तर पूर्व सीमेलगत असलेला देश.

|| दशरथ बारबोलो, यंगून, म्यानमार

गणेश उत्सव म्हटलं की मराठी किंबहुना भारतीय जनांचा मोठा उत्सव. आज १०० हून अधिक वर्षे लोटून गेली तरी देखील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम करीत आहे. आज भारताचं नव्हे तर जगातील ज्या ज्या देशात मराठी जण वास्तव्यास आहे त्या ठिकाणी हा उत्सव मोठय़ा जोमात साजरा केला जातो. परंतु असं असतानादेखील म्यानमार ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो येथे साजरा केला जाणाऱ्या गणेश उत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे. त्याचं कारण असं की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं म्यानमारशी असलेलं नातं.

म्यानमार भारताच्या उत्तर पूर्व सीमेलगत असलेला देश. स्वातंत्र्यापूर्वी हा ब्रिटिश इंडियाचाच एक भाग होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात टिळकांचा प्रभाव लक्षात घेता ब्रिटिशांनी त्यांना म्यानमारमधील मांडले शहरात ६ वर्षांकरिता तुरुंगवासास पाठवले. याच दरम्यान लो. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहून काढला.

जरी येथील ९०% हून अधिक लोक बौद्ध धर्माचे पालन करतात; परंतु येथील लोकांमध्ये हिंदू धर्माविषयी एक वेगळा आपुलकी पूर्वक आदर आहे. याव्यतिरिक्त म्यानमारचे नागरिक परंतु ज्यांचे मूळ भारतीय आहे अशा लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी भारतीय आणि चिनी संस्कृतीचा संगम होतो ती भूमी म्हणजे म्यानमार.

टिळकांचं या भूमीवरील वास्तव्य, भौगोलिकदृष्टय़ा भारताशी असलेली जवळीक, भारतीय वंशाचे लोक हे असूनदेखील दुर्दैव असे की येथे कोणीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत नसे.

मोरया गणेश उत्सव मंडळाने २०१५ पासून म्यानमारमध्ये गणेशउत्सवाची सुरुवात केली आणि गेल्या ४ वर्षांपासून यांगॉन जी म्यानमारची आíथक राजधानी आहे, येथे हा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो अगदी आपल्या मुंबई-पुण्यात केला जातो तसा.

सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य संग्रामात लोकप्रबोधन करण्यासाठी झाली; परंतु आज विविध क्षेत्रात असलेल्या समस्यांवर जागरूकता करण्याचे काम गणेशउत्सवा मार्फत बरीचशी मंडळी करत असतात. यातूनच प्रेरणा घेऊन मोरया गणेशउत्सव मंडळ प्रत्येक वर्षी एक संकल्पना घेऊन गणेश उत्सव साजरा करते.

मागील तीन वर्षे भारतापासून दूर असेल्या लहान मुलांना आपली संस्कृती कळावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हा उत्सव साजरा करताना भारतीय राजदूतावासाचे मोलाचे सहकार्य लाभते. प्रत्येक वर्षी भारताचे राजदूत प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थिती लावतात. भारतीय लोकांव्यतिरिक्त जेव्हा येथील नागरिक या उत्सवात सहभागी होतात आणि भारतीय संस्कृतीच कौतुक करतात, ही गोष्ट एक आयोजक म्हणून एक वेगळंच समाधान देऊन जातं.

या वर्षी म्हणजेच २०१८, मंडळाची संकल्पना आहे ‘पर्यावरण संवर्धन’ ज्याला आपण आजच्या सामान्य भाषेत ‘गो ग्रीन’ असे म्हणतो. याअंतर्गत लहान मुलांसाठी गो ग्रीन या संकल्पनेवर आधारित वेशभूषा, नृत्य व नाट्य या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पी ओ पीऐवजी साधी माती वापरून बाप्पांची मूर्तीदेखील गो ग्रीन या संकल्पनेवर साकारली आहे. आपल्या मुंबई- पुण्यात बाप्पांचं जसं आगमन होतं त्याप्रकारची मिरवणूक काढून बाप्पांचं स्वागत केलं गेलं. मंडपाची सजावट लोकांना पर्यावरण संवर्धन या विषयावर बोध होईल या प्रकारे केली आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ५२ स्पर्धक नृत्य व नाटय़ाच्या माध्यमातून गो ग्रीन ही संकल्पना साकारतील. दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं विसर्जन होईल.

जगात कुठेही जाऊ पण आपण भारतीय आहोत ही भावना नेहमी मनात कायम असते आणि आपले उत्सव ही भावना जोपासण्यात मोलाचं योगदान करतात. मोरया गणेशउत्सव मंडळ, म्यानमार आपले भारतीय सण साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 12:35 am

Web Title: ganesh chaturthi celebration 2018 2
Next Stories
1 राज्यात १५६ लाचखोर कर्मचारी अद्यापही सेवेत!
2 धर्मनिरपेक्षता, बहुसंख्याक, अल्पसंख्याक शब्दांची व्याख्या करणे गरजेचे
3 स्वातंत्र्यानंतर प्रथमच वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
Just Now!
X