|| हर्षद कशाळकर

विठू माऊलीच्या रुपातील गणपती बाजारात; एलईडी लाईटवाल्या गणेशमूर्तीची चर्चा

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणपती मुर्तीकारांचे गाव म्हणून नावारुपास आलेल्या पेण मध्ये गणेश मुर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देशभरातील विवीध भागात गणेश मुर्ती पाठवण्याचे काम सध्या सुरु आहे. एलईडी वाल्या गणपतीं पाठोपाठ यंदा विठू माऊली रुपातील गणपती बाजारात दाखल झाले आहे. देवतांच्या रुपातील गणेशमुर्तीना मोठी मागणी होतांना दिसते आहे.

पेण शहराला गणेशमुर्तीकलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. देवधर कुटूंबाने सुरु केलेला गणेशमुर्ती बनवण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परीसरात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. आज पेण शहरात गणेशमुर्ती बनवणारे १५० मुर्तीकार कार्यरत आहे. तर जोहे, हमरापुर,वडखळ आणि कामाल्रे परीसरात गणेश मुर्ती बनवणाऱ्या ४५० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मुर्त्यां तयार केल्या जातात. ज्या देशाविदेशातही पाठवल्या जातात. या मुर्तीकला व्यवसायातून दरवर्षी ५० ते ६० कोटींची उलाढाल होत आहे.

या वर्षीदेखील पेण मध्ये प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडूच्या मातीच्या गणेश मुर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. दगडूशेठ, लालबागचा राजा, सिध्दीविनायक, पेशवाई मुर्तीना सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठी मागणी आहे. मात्र विठूमाऊलीच्या रुपातील गणपती आणि वसईच्या राज्याच्या रुपातील गणेश मुर्तीना यावर्षी सर्वाधिक मागणी होते आहे. या शिवाय बालगणेशाच्या मुर्तीनाही ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.

या शिवाय पेण येथील दिपक समेळ यांनी एलईडी लाईट वाले गणपती हे सर्वत्र चच्रेचा विषय ठरले आहे.  मुर्तीला आकर्षक आणि रंगीबेरंगी एलईडी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच प्रकारच्या एलईडी लाईट वाल्या गणेश मुर्त्यां आणि गौरी बाजारात विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या मुर्ती अडीच ते तीन हजारांना विकल्या जात आहेत. अमेरीकन डायमंण्ड यांनी सजावट केलेल्या मुर्तीना सध्या जास्त मागणी असल्याचे निलेश समेळ यांनी सांगीतले. आकर्षक रंगसंगती आणि सुबक मुर्ती ही पेणच्या गणेश मुर्तीची वैशिष्ट असून यावर्षी जवळपास २५० प्रकारच्या गणेश मुर्ती विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

‘दरवर्षी नवनवीन गणेश मुर्तीना मागणी होत असते. मागील वर्षी बाहुबली, त्याआधी जय मल्हार आणि बाजीराव पेशवा रुपातील गणेश मुर्तीना मोठी मागणी होती. यावर्षी विठू माऊलीच्या रुपातील गणपतींनी सर्वाधिक मागणी होते आहे. वसईचा राजा गणपतीच्या प्रतिकृतीलाही चांगली मागणी आहे.’ – निलेश समेळ, गणेश मुर्तीकार, पेण.