हर्षद कशाळकर

टाळेबंदीचा राज्यातील अनेक कुटीर आणि लघुउद्योगांना फटका बसला आहे. रायगड जिल्ह्य़ातील पेण येथील गणेशमूर्ती व्यवसाय सध्या बंद आहे. कामगार उपलब्ध होत नसल्याने गणेशमूर्ती बनविण्याचे काम ठप्प झाले आहे.

पेण हे गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून नावारूपाला आले आहे. पेण परिसरात ४५० तर हमरापूर परिसरात ५०० गणेशमूर्ती कार्यशाळा आहेत. यात वर्षभर इथे गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. दरवर्षी लाखो गणेशमूर्तीची या परिसरात निर्मिती केली जाते. नंतर देश-विदेशात या गणेशमूर्ती विक्रीसाठी जात असतात. यातून वर्षांला ६० ते ६५ कोटींची उलाढाल होत असते. तर संपूर्ण तालुक्यातील १५ ते २० हजार कामगारांना यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. मात्र करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे व्यवसाय सध्या बंद करण्यात आले आहेत.

हा व्यवसाय रोजगारक्षम उद्योग म्हणून ओळखला जातो. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ मूर्तिकारांना गणेशोत्सवात मिळते. तोवर होणारा कामगारांचा खर्च हा कार्यशाळा चालवणाऱ्यांना सोसावा लागतो. मात्र मूर्ती बनवण्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे गणेशमूर्ती कार्यशाळा चालकांची कोंडी झाली आहे. मूर्तिकाम बंद झाल्याने त्यांचे वर्षांचे नियोजन कोलमडणार आहे.

या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने केरळ, गुजरात आणि राजस्थानमधून येत असतो. मात्र वाहतूकसेवा खंडित झाल्याने कच्चा माल येणेही बंद झाले आहे. त्यामुळे गणेशमूर्तिकार आणि कार्यशाळांमधील कामगारांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

करोनाच्या साथीमुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ सर्वांवर आली आहे. मूर्ती बनवण्याचे काम बंद पडले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर वर्षभर केलेले नियोजन कोलमडणार आहे. मागणी इतक्या गणेशमूर्ती तयार होऊ शकणार नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान होईल.

– नीलेश समेळ, गणेश मूर्तिकार, पेण