‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लौकर या’ या निरोपाच्या घोषणांनी गौरी बरोबर घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. सातारा येथील विविध तळी तसेच कृष्णा नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

फुटक्या तळ्यावर विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आला आहे. तसेच निर्माल्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बाकी तळ्यांवरही ही व्यवस्था करण्यात आल्याने गणेश विसर्जनासाठी भाविकांची सोय होत होती.मंगळवार तळ्याजवळ पाच, मोती तलावाजवळ पोहण्याचा तलाव तर फुटक्या तळ्याजवळ दोन कुंडे मूर्ती विसर्जनासाठी ठेवण्यात आली होती. प्रतापसिंह शेती शाळेजवळ ४४ लाख रुपये खर्चून ३२ फूट उंच, २२ फूट लांब व २४ फूट खोल कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. या तलावात २२ लाख लिटर्स पाणी मावेल. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही नगर पालिकेने ही सोय केली आहे.पालिकेने सहा व बारा टनी क्रेनची सोय केली आहे. दुपारनंतर घरगुती गणपतींचे विसर्जन मोठय़ा भक्तिभावात करण्यात आले. शाळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन सकाळी करण्यात आले. शनिवारपासून देखावे पहाण्यास नागरिक गर्दी करतील या साठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. या वर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त अधीक्षक ,सात उपाधीक्षक, २२ पोलिस निरीक्षक, ८० सहायक निरीक्षक -उपनिरीक्षक, एक हजार ८३७ पोलिस कर्मचारी , ७०० होमगार्ड , राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा , जलद कृती दलाच्या दोन तुकडय़ा ,  जलद प्रतिसाद पथकाच्या दोन तुकडय़ा तर चार स्ट्रायकींग फोर्सची पथके तनात करण्यात आली आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजावटीची जय्यत तयारी केली आहे.प्रबोधनात्मक देखाव्यांसाठी राज्य शासनाने पारितोषक ठेवल्याने अनेकांचा कल सामाजिक प्रबोधन देखाव्यांवर आहे.स्वयंसेवी संस्थांनीही बक्षिसे ठेवल्याने या स्पर्धामध्ये चुरस वाढेल हे नक्की.