विश्वास पवार, वाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद नवा नाही. गणपती विसर्जनावरून पुन्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला असून, यातून उभयतांनी परस्परांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे.

साताऱ्यात गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद सुरू आहे. सातारा शहरातील गणपती विसर्जन मंगळवार, मोती आणि फुटक्या तळ्यात होत होते. ऐतिहासिक मंगळवार, मोती आणि फुटक्या तळ्यात विसर्जन करू नये. यामुळे जैवविविधता धोक्यात येते व प्रदूषण पसरते यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने या तळ्यांत विसर्जनास बंदी घातली आहे. पालिकेने गणपती विसर्जनाची स्वतंत्र कृत्रिम तळे तयार करून त्यात विसर्जन करावे, असे न्यायालयाने सांगितले. चार वर्षांपासून साताऱ्यात गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणपती आले की विसर्जनासाठी तळ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरू होते.

पूर्वी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या चुलत बंधूंमध्ये राजकारणात मनोमीलन झाले होते. पूर्वी पालिकेत दोघांची एकत्र सत्ता होती. आता या दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची कोणतीही संधी सोडत नाहीत. गणपती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर नवी ठिणगी पडली आहे. गणपती उत्सवापूर्वी विसर्जनाच्या मुद्दय़ावर साताऱ्यात चर्चा सुरू झाली. न्यायालयाने साताऱ्यातील पारंपरिक व ऐतिहासिक तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी घातली आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवार तळ्यातच गणपती विसर्जन होणार, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर केले. याला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत या तळ्यात विसर्जनास परवानगी देणार नाही. यासाठी पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, असे सुचविले. यानंतर पालिकेने घाईघाईत विशेष सभा घेत याबाबतचा ठराव मंजूर करीत फेरविचार याचिका दाखल केली. न्यायालयाने ही फेरविचार याचिका फेटाळली. यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले. यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सूत्रे हाती घेत या तळ्याव्यतिरिक्त शहरातील इतर तळी, तलाव, कृष्णा नदीत माहुली येथे तर मोठय़ा मूर्ती जवळच्याच कण्हेर धरणाच्या खाणीत विसर्जित करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला. मात्र ऐतिहासिक तळ्यात विसर्जनास परवानगी देणार नाही असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. ऐतिहासिक मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन होऊ  नये यासाठी पोलिसांकडून राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. गणपती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर घरगुती गणपतींचे तळ्यात विसर्जन होऊ  नये यासाठी शस्त्रधारी पोलिसांचा तळ्याला वेढा आहे. याआधी गणेशोत्सवात कर्णकर्कश वाद्ये वाजणारच, अशी भूमिका उदयनराजे यांनी घेतली होती.

ऐतिहासिक मंगळवार तळे हे माझ्या मालकीचे आहे. त्यामुळे माझ्या मालकीच्या तळ्यात मूर्ती विसर्जनासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. तिथे पोलीस तैनात करण्यात आले असले तरी मंगळवार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांनी मंगळवार तळ्यातच विसर्जन करावे. कोण अडवतो ते बघतोच. गुन्हे दाखल झाले तर माझ्यावर होतील, मंडळावर नाही. जनतेसाठी मी काहीही करायला मागे-पुढे पाहणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील.

– उदयनराजे भोसले, खासदार

ऐतिहासिक मंगळवार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनास परवानगी देऊ नये. यामुळे जलप्रदूषण होते. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ  नये म्हणून गणेश मंडळांची बैठक घेऊन अपयशाचे खापर प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न खासदार उदयनराजे भोसले करीत आहेत. सातारकर जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांनी जाहीर माफी मागावी.

 – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh idol immersion udayanraje bhosale shivendra singh raje bhonsle
First published on: 19-09-2018 at 02:24 IST