पेणमधून ३५ लाख गणेशमूर्तीचे देशविदेशात प्रस्थान

गणेशमूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून या वर्षी जवळपास ३५ लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने यावर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली आहे.

आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातून मागणी होत असते. पेणमध्ये गणपती बनवणारे ४५० लहानमोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी ३५ ते ४० लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. देशविदेशात या गणेशमूर्तीची विक्री केली जाते यातून जवळपास ४० कोटींची उलाढाल होत असते. यावर्षी देखील पेणमधून ३५ लाख गणेशमूर्ती देशविदेशात पाठविण्यात आल्या आहेत.

मात्र काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग आणि कारागिरांची मजुरी यात वाढ झाल्याने गणपतींच्या किमतीत यंदा १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा केरळ, राजस्थान आणि गुजरातमधून येत असतो. त्यामुळे काथ्या, शाडूची माती आणि पिओपीच्या किमती आणि वाहतूक खर्चात दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ होत असते.

दुसरीकडे कुशल कारागिरांची कमतरता ही पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायासमोरील मोठी अडचण असते. त्यामुळे चांगली मजुरी देऊन कारागीर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना दिवसाला ४०० ते ५००  रुपये द्यावे लागतात. त्यामुळे गणपतींच्या किमती दरवर्षी २० ते ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागतात, असे येथील गणेश मूर्तीकार सांगतात.

गणपतीच्या किमतीत दरवर्षी २५ ते ३० टक्के वाढ अभिप्रेत असताना, मूर्तीकार बरेचदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात किमती वाढवत नाहीत. या व्यवसायात असलेली स्पर्धा याला कारणीभूत असते.

पूर्वी पेण शहरापुरता असलेला हा व्यवसाय आज संपूर्ण तालुक्यात पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा पर्याय उपलब्ध आहे. ही बाब लक्षात घेऊन कच्चा मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली तरी मूर्तीच्या किमतीत मोठी वाढ करता येत नाही, अशी माहिती दीपक समेळ यांनी दिली.

‘कुशल कारागिरांची मजुरीत मोठी वाढ झाली आहे. मूर्तीची आखणी आणि रंगकाम करणाऱ्या कारागिरांना दिवसाला ५०० ते १००० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे कारखाने वाढल्याने कारागिरांची कमतरता आहे. याचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवर होत आहे.’

श्रीकांत देवधर, अध्यक्ष, पेण गणेश मूर्तीकार संघटना.