19 February 2020

News Flash

पाणीटंचाईमुळे लातूरमध्ये गणेश विसर्जन यंदा अशक्य, मूर्ती दान करण्याचे आवाहन

काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर, लातूर

सार्वजनिक गणेश उत्सवाची शतकी परंपरा पाळणाऱ्या लातूर शहरामध्ये यंदा पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पहिल्यांदाच गणेशमूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे. बहुतांश ठिकाणी विहिरीत आणि धरणात पाण्याचा थेंबही नाही. जेथे पाणी आहे ते पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार असल्याने मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या ठरलेल्या मार्गावरून मिरवणुका काढाव्यात. मात्र, गणेशाचे विसर्जन करू नये, असे आवाहन येथील महापालिका उपायुक्तांनी केले आहे.

विघ्नहर्ता पाण्याचे संकट दूर करेल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, या दहा दिवसातही पुरेसा पाऊस झाला नाही.  घरगुती गणेशाचे विसर्जन न करता प्रत्येकाने वर्षभर मूर्ती घरीच ठेवून द्यावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनी विनंती केल्यास त्यांना मूर्तीचे दान द्यावे किंवा  जे गणेशाची मूर्ती तयार करतात अशा मंडळींना त्या मूर्ती दान कराव्यात . शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेकडे गणपतीची मूर्ती दान करावी. मात्र, शहरात कुठेही गणपती विसर्जनासाठी अट्टहास धरू नये, असे आवाहन  महापालिकेने केले आहे.

झाले काय?

’यंदा लातूरमध्ये सप्टेंबरअखेर  नळाने पाणी देता येईल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत पिण्यासाठी आरक्षित करण्यात येत आहेत. गणेश विसर्जनासाठी शहरातील पारंपरिक विहिरीमध्येही यावर्षी पुरेसे पाणी उपलब्ध नाही.

’आहे ते पाणी वापरता येईल त्यामुळे यावर्षी मंडळांनी आपल्या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन गणेश मंडळाच्या बठकीत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले होते, त्याला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.

इतिहासातील पहिलीच घटना

गेल्या शंभर वर्षांत देशात अथवा देशाबाहेरील कोणत्याही शहरावर पाणी नाही म्हणून गणेशाचे विसर्जन न करण्याची वेळ आली नाही. यावर्षी लातूरकरांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. या संकटाशी सर्वानी मिळून सामना करू. धार्मिक बाबतीत अकारण भावनिक होऊ नये.

 – सु. ग. जोशी, इतिहास संशोधक, लातूर

First Published on September 11, 2019 3:11 am

Web Title: ganesh immersion in latur is impossible this year zws 70
Next Stories
1 मोहरम मिरवणुकीत पीर मंगलबेडा सवारीवर गणपतीच्या मंडपातून पुष्पवृष्टी
2 Video : कागदाच्या लगद्यापासून साकारला बाप्पा; लहान मुलंही पेलू शकतात वजन
3 VIDEO: पुणे – दगडूशेठ हलवाई गणपतीला १२७ लिटर दुधापासून तयार केलेला आईस्क्रीमचा मोदक अर्पण
Just Now!
X