News Flash

देशातील चौथ्या क्रमांकाच्या प्रदूषित चंद्रपुरात

शहरातील १५० लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या तीव्र प्रदूषणाची दखल घेऊन राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, रिसर्च अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इस्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स व उपप्रादेशिक

| August 29, 2014 12:50 pm

शहरातील १५० लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या तीव्र प्रदूषणाची दखल घेऊन राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, रिसर्च अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इस्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स व उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘गणेशोत्सव-२०१४- प्रदूषण जनजागृती सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने उद्योगांची कार्यशाळा व प्रदर्शन, पर्यावरण व शुध्द वातावरण यावर परिसंवाद, चित्रकला व वादविवाद स्पर्धाचे आयोजन केले आहे. शहरातील प्रदूषणमुक्तीसाठी होणारा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. औद्योगिक जिल्हा असलेले चंद्रपूर देशात प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर आहे. या शहरातील लोकांना प्रदूषणामुळे दमा, श्वसन, ह्रदयविकार, त्वचा, केस गळती यासह अनेक आजारांनी ग्रासले आहे.
प्रदूषणामुळे सुमारे १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रदूषणाची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नीरी व टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने तांत्रिक अहवाल तयाार करून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. यात वीज मंडळाचे प्रदूषण करणारे चार संच बंद करून एक हजार कोटी खर्च करण्याची सूचना केली आहे. या शहराच्या प्रदूषणावर सर्व बाजूने अभ्यास व संशोधन होत असतांना परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी म्हणून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाऊल उचलले आहे. यासाठी गणेशोत्सवाचे निमित्त साधले आहे.
‘गणेशोत्सव-२०१४- प्रदूषण जनजागृती सप्ताह’ च्या माध्यमातून प्रदूषणावर एक आठवडाभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
उद्या, २९ ऑगस्टला श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक व सामाजिक महत्वाच्या विषयांवर समाजात संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. या सप्ताहात प्रदूषणाची पातळी, कारणे, नियंत्रणाचे उपाय व आरोग्यावरील परिणाम, याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे, तसेच प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या उद्योगांची कार्यशाळा व प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टला भरवले जाणार आहे.
या उपक्रमात वेकोलि, एसीसी, माणिकगड सिमेंट यासह जिल्हाभरातील किमान २० छोटे- मोठे उद्योग सहभागी होणार आहेत. उद्योग व त्यांचा सीएसआर निधी अशा पध्दतीने खर्च केला जातो, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना, प्रदूषण जागृतीसाठी कार्यक्रम आदि विषयांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आंतर शालेय वादविवाद स्पर्धा, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, पर्यावरण व शुध्द वातावरण यावर परिसंवाद होतील. सरदार पटेल मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्राचार्य मदनराव धनकर, रमेशपंत मामीडवार, प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दीक्षित, वेलंकीवार व पराग धनकर यांच्या व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्ताने प्रदूषण मुक्तीसाठी एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाला लोकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आघाडीचा औद्योगिक जिल्हा असतांना केवळ देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर, हा या शहरातील प्रत्येक लोकांच्या माथ्यावर लागलेला कलेक मिटविण्यासाठीच हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 12:50 pm

Web Title: ganeshotsav 2014 pollution awareness week to celebrate in chandrapur
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात नाशिकच्या ‘द मिथ’ला स्थान
2 कोकणात पावसाचा जोर कायम
3 गडचिरोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात ११७ पदे रिक्त
Just Now!
X