गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यावेळी प्रसादातून घातपात केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधी सर्व सार्वजनिक मंडळांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यासंबंधी गणेश मंडळांना नोटीस जारी केली आहे. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घातपात केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सार्वजनिक मंडळांची संख्या खूप आहे. या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. यावेळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. या प्रसादाच्या माध्यमातूनच विषबाधा केली जाऊ शकते अशी भीती व्यक्त करत सार्वजनिक मंडळांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने प्रसाद तयार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी काही सूचना केल्या आहेत. महाप्रसादात बाहेरील कोणतीही गोष्ट एकत्रित करण्याचा प्रयत्न होत असल्यास तसं होऊ देऊ नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने अशी नोटीस नेहमीच बजावली जात असं सांगत घातापाताची शक्यता नाकारली आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा पद्धतीची नोटीस सार्वजनिक मंडळांना नेहमीच दिली जाते असं सांगितलं आहे. सार्वजनिक मंडळांना महाप्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य, खाद्य पदार्थांचा दरवाजा तपासण्याचा आदेश नेहमीच दिला जातो. त्यामुळे यावेळी काही वेगळी नोटीस देण्यात आली नाही असं अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत
गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे. कछ परिसरातून ही घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे. भारतात दहशतवादी हल्ला करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा मुख्य हेतू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा सुरक्षा दल आणि भारतीय तटरक्षक दलासोबत सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.