कर्जातून खरेदी केलेल्या नव्या क्रूझर वाहनाचे हप्ते फेडण्यासाठी दोन भगिनींना प्रवासी म्हणून गाडीत बसवून वाटेत अचानकपणे एका भगिनीचा खून केला व दुस-या भगिनीच्या खुनाचा प्रयत्न करून त्यांच्या अंगावरील पाच तोळे सोन्याचे दागिने लुटून नेणा-या टोळीतील तिघांना सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द गावाजवळ गेल्या ३ मे रोजी गुन्हय़ाचा प्रकार घडला होता.
भीमराव राठोड (५०, रा. शिवाजीनगर लमाण तांडा, अक्कलकोट), त्याचा मुलगा राहुल राठोड (२२) व भीमराव याच्या मेहुण्याचा मुलगा राजू महादेव चव्हाण (२०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. भीमराव याचा दुसरा मुलगा रोशन याचादेखील गुन्हय़ात सहभाग असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाची माहिती सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेशमा दादासाहेब पळसे (३२, रा. तरटगाव, ता. पंढरपूर) व त्यांची सख्खी थोरली बहीण सुनंदा शंकर घोडके (३७, रा. मुंढेवाडी, ता. मंगळवेढा)या दोघी कामती खुर्द येथे माहेरी गावच्या यात्रेसाठी आल्या होत्या. यात्रा संपल्यानंतर ३ मे रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास त्या आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी दोन एसटी बसला थांबण्याची विनंती केली असता बसेस थांबल्या नाहीत. तेव्हा काही वेळेतच क्रूझर गाडी येऊन थांबली. दोन्ही बहिणींनी मंगळवेढय़ाकडे जाणार काय, असे विचारले असता होकारार्थी उत्तर मिळाल्याने दोघी बहिणी क्रूझर गाडीत बसल्या. गाडीत चालकाच्या शेजारी दोन आणि मागे एक असे तिघे पुरुष बसले होते. गाडी कामती बुद्रुक गावाच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर गेली असता मागे बसलेल्या एका पुरुषाने रेशमा पळसे यांच्या गळय़ात दोरी टाकून फास दिला. त्याच वेळी बहीण सुनंदा घोडके यांचाही गळा आवळण्यात आला. यात सुनंदा यांचा मृत्यू झाला, तर रेशमा यांची शुद्ध हरपली. दोघींच्या गळय़ातील पाच तोळे सोन्याचे दागिने व मोबाइल संच काढून घेऊन दोघींना पुढे कोरवली गावच्या माळरानावर टाकण्यात आले होते. रेशमा या नंतर शुद्धीवर आल्या असता त्यांनी घडलेली घटना एका मोटारसायकलस्वाराच्या मदतीने आपल्या भावाला कळवली. कामती पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली.
या गुन्हय़ाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी गुन्हय़ाची उकल होण्यासाठी गुन्हे शाखा व कामती पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने जिल्हय़ातील सर्व क्रूझर गाडय़ांची यादी प्राप्त करून त्या आधारे प्रत्येक गाडीच्या मालक व चालकाचे वर्तन तसेच गुन्हा घडल्याच्या दिवशी ती गाडी कोठे होती, याची माहिती मिळविली. गुन्हय़ात वापरलेल्या क्रूझर गाडीवर ‘जय मातादी’ लिहिलेले छायाचित्र होते. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यात ही गाडी टिपण्यात आली. त्यामुळे गुन्हा उकलण्यास मदत झाली. या गाडीचा शोध घेतला असता ती अक्कलकोट येथील शिवाजीनगर लमाण तांडय़ावर राहणा-या भीमराव राठोड याची असल्याचे निष्पन्न झाले. ही गाडी सोलापुरात रुबी नगरातील एका नातेवाइकाकडे ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हय़ाचे कारण उघड झाले. भीमराव राठोड याने कर्ज काढून क्रूझर गाडी खरेदी केली होती. कर्जाचे हप्ते थकले होते. हे थकीत हप्ते भरण्यासाठी राठोड याने आपली दोन्ही मुले व मेहुण्याचा मुलगा यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उजेडात आले. यातील भीमराव राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात ठाण्यात नवपाडा पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर, सहायक पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सुनील खेडेकर, उपनिरीक्षक सागर काटे, सहायक फौजदार शिवाजी घोळवे, हवालदार भरत जाधव, हांडे, वाकडे, कांबळे, राजू गायकवाड, मल्लिनाथ चडचणकर, नारायण गोलेकर आदींनी पूर्ण केली.