सोलापूर : सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून प्रत्येकी २१ वर्षांची सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. पंढरपूरसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात हा खटला गाजला होता.

भीमा ऊर्फ ढोबळ्या सुरेश शिंगाडे (वय ३३) आणि अनिल मारुती पवार (वय ३५, दोघे रा. पंढरपूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.  पंढरपूरचे तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एस. बावीसकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होऊन त्यांनी दोन्ही आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली. या खटल्याची पाश्र्वभूमी अशी की, २२ जुलै २०१६ रोजी पीडित महिला आपल्या घरात रात्री एकटी झोपली होती. तिचा पती व मुलगा दुसरीकडे नव्या घरात झोपायला गेले होते. ही संधी साधून पहाटेच्या सुमारास आरोपी अनिल पवार व ढोबळ्या शिंगाडे यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. नंतर गुंडगिरी करीत दहशत माजवत, पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या नवऱ्यासह तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर पीडित महिलेने पतीला घडलेला प्रकार सांगितल्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. आरोपी अनिल पवार हा अनोळखीचा असल्याने त्याची ओळख परेड पंढरपूरच्या तहसीलदारासमोर झाली असता त्यात पीडित महिलेने त्याला ओळखले होते.

या गुन्ह्य़ाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी व घन:शाम बल्लाळ यांनी करून दोन्ही आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर यानी अकरा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी पीडित महिलेसह तिचा पती, मुलगा तसेच नायब तहसीलदार सुरेश तिटकारे आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपी भीमा ऊर्फ ढोबळ्या शिंगाडे याने फिर्यादीच्या पतीला केलेल्या कामाचे पैसे द्यायचे नाहीत म्हणून वाईट हेतूने खोटी फिर्याद दाखल केली, तर दुसरा आरोपी अनिल पवार याने राजकीय हेतूने खोटा खटला दाखल केल्याचा बचाव केला. यावेळी सरकारी वकील वांगीकर यांनी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायनिवाडे संदर्भादाखल सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरले. २१ वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी आठ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.