20 February 2019

News Flash

‘मराठवाडय़ाचे गांधी’ गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन

जिल्ह्यातील वसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला.

सर्वोदयी विचार रुजावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले. ‘मराठवाडय़ाचे गांधी’ अशी त्यांची सर्वदूर ओळख होती. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार अंगीकारत मराठवाडय़ाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अखेरच्या शिलेदाराचे निधन झाल्याने मराठवाडाभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाíथवावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जिल्ह्यातील वसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. दरम्यान, त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले.  महाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. आजेगाव येथील लढय़ात शस्त्र घेऊन ते प्रत्यक्ष लढले. मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, चंद्रकोंत पाटील इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.

स्वातंत्र्योत्तर भारतात गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्यावेळी शांतीसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर १९४२ ला आंदोलन, आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडीचे शिलेदार, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी  संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापन कार्य, जंगल-जमिनी यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी अनेक मोठी कामे त्यांच्या कार्ययादीत आहेत. मागील काही वर्षांपासून डॉ. अग्रवाल आजारी होते. २२  सप्टेंबर रोजी त्यांना नांदेड येथे डॉ. काब्दे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या विनंतीवरून डॉक्टरांनी त्यांना वसमतला घरी जाण्याची परवानगी दिली. बुधवारी त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठवाडय़ाचा गांधी काळाच्या पडद्याआड गेला, अशी श्रद्धांजली सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, डॉ. व. द. भाले, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी गंगाप्रसादजींच्या रूपाने कर्मयोगी हरपल्याची प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण लोकार्पित जीवन, त्याग, सद्गती आणि सात्त्विकतेचे रूप म्हणजे गंगाप्रसादजी अग्रवाल. ते कर्मकांडी धार्मिक कधीच नव्हते. परंतु त्यांच्या सान्निध्यात ध्यान, प्रार्थनेचा अलौकिक अनुभव येत असे. ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. मूल्यांच्या र्सवकष ऱ्हासकाळात ते कधीच निराश झाले नाहीत. परिवर्तनासाठी ते सतत धर्मभावनेने संघर्षरत राहिले. त्यांच्या जाण्याने गांधीयुगातील शेवटचा विरक्त योगी आम्ही हरवल्याचे ज्येष्ठ साहित्यिक भ. मा. परसवाळे म्हणाले.

First Published on October 12, 2018 12:45 am

Web Title: gangaprasad agrawal passed away