बनावट सोने देऊन फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असणा-या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच हल्ल्याचा प्रयत्न मिरजेत गुरुवारी झाला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात सांगली व कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तिघांना पकडले असून एकटा फरारी झाला.
कोल्हापूर येथील एका सराफ व्यावसायिकाला ८ लाखाचे सोने १ लाख रुपयात देण्याची तयारी आरोपींनी दर्शविली होती. या संदर्भात सराफाने कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधला. कोल्हापूर व मिरजेच्या पोलिसांनी सराफाकरवी सापळा लावला. आरोपींनी सोने घेण्यासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात बोलावले. पोलिसांचे संयुक्त पथक त्या ठिकाणी गेले. पोलीस आल्याचे पाहून टोळीने पोबारा करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी पळून जाणा-या या टोळीला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्यावरच चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या वेळी आरोपी व पोलिसांची झटापटही झाली. या झटापटीत एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र टोळीतील तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन चाकू हस्तगत करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत या आरोपींकडे पोलीस कसून चौकशी करीत होते. रीतसर गुन्हा दाखल करण्याची कारवाई वेळाने होणार असल्याने आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली.