शहरात वाढलेल्या भुरटय़ा गुंडगिरीचा त्रास व्यापा-यांना होत असून शुक्रवारी दुपारी दत्त चौकातील डॉ. अंत्रोळीकर व्यापारसंकुलात बी.पी.एल. गॅलरी या दुकानात गुंडांच्या टोळीने घुसून व्यापा-याला बेदम मारहाण केली. मोबाइल संच दुरुस्त केल्याचे बिल मागणे व्यापा-याला महागात पडल्याचे सांगण्यात आले.
दिनेश आहुजा (३५, रा. गुरू नानकनगर, सोलापूर) असे गुंडांच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. दुपारी आहुजा हे आपल्या बीपीएल गॅलरी दुकानात बसून व्यापार सांभाळत असताना १० ते १२ तरुणांच्या टोळीने दुकानात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. यात त्याच्या तोंडाला, हाता-पायाला मार बसला. जबर जखमी अवस्थेत आहुजा हे दुकानात पडले होते. या घटनेमुळे दत्त चौक, नवी पेठ परिसरात व्यापारी संतप्त झाले. या घटनेनंतर व्यापा-यांनी आहुजा यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेऊन संबंधित गुंडांच्या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
तथापि, व्यापा-यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होणार याचा अंदाज घेऊन संबंधित गुंडांच्या टोळीतील एका तरुणाने व्यापा-याने आपणास मारहाण केल्याची तक्रार करीत शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी धाव घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधित व्यापा-यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. सार्वजनिक उत्सवापासून ते गल्लीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तथाकथित पुढा-याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्गणीच्या नावाखाली व्यापा-यांकडून खंडणी वसूल केली जाते. या संदर्भात पोलीस प्रशासनाची विश्वासार्हतेचा अभाव असल्यामुळे तक्रार नोंदविण्यास व्यापारीवर्ग धजावत नाही. अनेक प्रकरणात पोलीस व्यापारी व त्यांना त्रास देणा-या गुंडांकडून परस्परविरोधी फिर्याद नोंदवून घेतात. तर काही वेळा व्यापा-यांना न्याय न देता उलट, त्यांनाच त्रास दिला जातो, असा पोलिसांविषयीचा कटू अनुभव असल्याचे नव्या पेठेतील काही व्यापा-यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.