News Flash

अमरावतीत गोळीबार, टोळीयुद्ध पेटले

दोन महिन्यांपूर्वी चांदणी चौक या मुस्लीमबहुल परिसरात शनिवारी दोन टोळ्या आमने-सामने आल्यानंतर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरूच असतानाच सोमवारी सायंकाळी गुलिस्तानगर भागात

| January 14, 2015 07:33 am

दोन महिन्यांपूर्वी चांदणी चौक या मुस्लीमबहुल परिसरात शनिवारी दोन टोळ्या आमने-सामने आल्यानंतर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरूच असतानाच सोमवारी सायंकाळी गुलिस्तानगर भागात उपमहापौर शेख जफरचा सहकारी सैय्यद आरिफ सैय्यद साबीर ऊर्फ आरिफ लेंडय़ा (४२) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात गंभीररीत्या जखमी झालेल्या आरिफला नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
आरिफ हा आपल्या पुतणीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी कुटुंबीयांसह यवतमाळ येथे जाण्याच्या तयारीत असतानाच ६ ते ७ मोटरसायकलींवरून आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी आरिफला त्याच्या घराजवळ घेरले. हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्यावर जवळून दोन गोळ्या झाडल्या. काही आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले. लगेच काही लोकांनी हल्लेखोरांवर चाल केली. दगडफेक होताच हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी बाबाद्दिन, कलंदर आणि अहफाज या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यासह कैमुद्दिन, नियाजोद्दिन, अज्जू उर्फ रियाजोद्दिन, वसीम चायना, हबीब, शब्बीर पहलवान, अशर चायना यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमागे पूर्ववैमनस्याचे कारण सांगितले जात असले, तरी या टोळ्यांमधील संघर्षांत अनेक पैलू दडलेले आहेत. पोलिसांनी चांदणी चौकात २३ नोव्हेंबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याच्यासह त्याच्या टोळीतील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.
आरिफला जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला रात्री नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. आरिफ हा शेख जफरचा निकटस्थ आहे. शेख जफरच्या विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील असोरिया पेट्रोल पंपासमोर बाबाद्दिन याच्यावर हल्ला करून गोळ्या झाडल्याप्रकरणी शेख जफर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.
हल्ल्यानंतर आंध्रप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शेख जफरला पांढरकवडा पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली होती. पोलिसांनी चांदणी चौक गोळीबार प्रकरणी साबीर खान याच्या तक्रारीवरून शेख जफर, आरिफ लेंडय़ा, अजहर, श्याम, साबीर काल्या, नाजाबीब, शारिक आणि नईम या आठ जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवले होते.
अमरावतीला टोळीयुद्धाचा पूर्वइतिहास आहे. रक्तरंजित संघर्षांत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्यंतरीच्या काळात या टोळ्यांच्या कारवाया संथ झाल्या होत्या, पण काही घटनांमधून या टोळ्यांनी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवून दिली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये मुस्लीमबहुल परिसरातील टोळ्यांमध्ये संघर्ष वाढले आहेत. यात पिस्तुलांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अनधिकृत रिव्हॉल्वर्स मोठय़ा संख्येने शहरात वापरात असल्याचे हे निदर्शक ठरले आहे.
पोलिसांनी मात्र यासंदर्भात कडक कारवाई अजूनही न केल्याने गुन्हेगार टोळ्यांचे फावले आहे. शेख जफर याने पत्रकार परिषद बोलावून आपण निर्दोष असल्याचे आणि आपल्याला अडकवण्याचा कट असल्याचे स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 7:33 am

Web Title: gangwar in amravati
टॅग : Maharashtra
Next Stories
1 गडचिरोली जिल्ह्यत पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करू
2 अमरावतीत ‘टेकलॉन्स’चा दिमाखदार प्रारंभ
3 सर्वधर्मीयांमध्ये देहदानाचा विचार रुजतोय
Just Now!
X