गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्याने आणि दाढी लावल्याने अकोल्यात तणाव निर्माण झाला होता. गायगाव येथील गणपती मंदिरात हा प्रकार घडला. गणपतीला सांताक्लॉजप्रमाणे सजवण्यात आल्याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते थेट मंदिरात पोहोचले होते. मात्र मंदिराच्या ट्रस्टींना माघार घेताच प्रकरण निवळलं.

ख्रिसमस आणि अंगारकी एकाच दिवशी असल्याने मंदिरातील पुजाऱ्याने गणपतीला सांताक्लॉजची लाल रंगाची टोपी घातली होती. इतकंच नाही तर पांढरी दाढीही लावली होती. अंगारकी असल्याने दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांची गर्दी होत होती. भक्तांनी मूर्ती पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर काही वेळातच ही माहिती सगळीकडे पसरली.

माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते थेट मंदिरात घुसले आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र मंदिराच्या ट्रस्टींनी माघार घेतल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते शांत झाले. दरम्यान तणाव निर्माण झाल्याने मंदिराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते.