News Flash

जाणून घ्या धुळ्यातील ‘खुनी गणपती’च्या विसर्जन मिरवणुकीचा इतिहास…

हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक बनलाय खुनी गणपती

जामा मशिदीसमोर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जमलेला मुस्लिम समुदाय

दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर राज्यभरात विसर्जन सोहळा पार पडत आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील मुर्त्यांचं ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन केलं जातंय. लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेल्या गणेशोत्सवाने आता राज्यभर मोठं रुप धारण केलं आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये आपण गणपती आणि त्याच्या मंदिराच्या कथा ऐकल्या असतील. अशाचप्रकारे धुळ्यातील ‘खुनी गणपती’ची मिरवणूकही सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आहे.

खुनी गणपती हा धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. १८९५ साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. एका वर्षी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. त्यावेळी गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला, काही वेळातचं या भांडणाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यावेळी उपस्थिती ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला, ज्यामध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले. यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत रुढ झाली…या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचं ‘खुनी गणपती’ हे नाव पडलं.

यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला. दोन्ही गटांमध्ये एकोपा रहावा यासाठी २२८ रुपये देण्यास सुरुवात झाली. त्यावर्षापासून आजपर्यंत धुळ्यातील ‘खुनी गणपती’ हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक बनलेला आहे. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. संध्याकाळी ५ वाजता म्हणजेच नमाजाची अजान होत असताना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दारासमोर येते. यावेळी रिवाजाप्रमाणे मशिदीमधून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीत उपस्थित असलेल्या ज्येष्ठ धार्मिक अधिकाऱ्याकडून गपणतीला गुलाबांच्या फुलाचा हार घालून आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. धुळ्यातील अनेक स्थानिक लोकांच्या मतानुसार मशिदीसमोर आल्यानंतर गणपतीची मुर्ती जड होते.

सध्याच्या घडीला अनेक गोष्टींवरुन हिंदू-मुस्लिम समुदायामध्ये बिघडलेल्या वातावरणाच्या बातम्या आपण पाहत असतो, अशातच धुळ्याच्या ‘खुनी गणपती’ने जपलेली आपली सामाजिक सलोख्याची परंपरा खरच शिकण्यासारखी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाला आलेल्या झगमगाटाच्या काळातही ‘खुनी गणपती’ सोहळ्याचं पारंपरिक रुप जपून आहे. राज्यातल्या सर्वच भागातील मंडळांनी धुळ्यातल्या ‘खुनी गणपती’चा आदर्श समोर ठेवायला हरकत नाही.

(( ‘खुनी गणपती’च्या इतिहासाबद्दलची माहिती मुंबईतील तेजस कुलकर्णी या वाचकाने लोकसत्ता.कॉमला पाठवली आहे.))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 9:51 pm

Web Title: ganpati immersion 2018 ganeshotsav anant chaturdashi know the tradition of khuni ganpati in dhule city of maharashtra
Next Stories
1 नाशकात भाजपा आमदाराच्या मंडळाकडून डीजेचा दणदणाट; कोर्टाचा आदेश धुडकावला
2 Video : आजपासून ७० वर्षांपूर्वी असा होता मुंबईतील विसर्जन सोहळा
3 नद्यांच्या स्वच्छतेसाठी आता ‘ड्रोन बोट’चा पर्याय; पहिली चाचणी यशस्वी
Just Now!
X