करवीर नगरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत नेत्रदीपक रोषणाईसह देखाव्याचे वैविध्य पाहता येणार असले तरी गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात डॉल्बी लावण्यासाठी तरुण मंडळांनी उचल खाल्ली असल्याचे चित्र रविवारी सायंकाळी पाहयला मिळाले. शिवाजी पेठेतील बहुतांशी मंडळांसह अनेक मंडळांनी ताराबाई रोडवर विसर्जनासाठी वाहने आणून लावली असून त्यावर डॉल्बीचे साहित्य चढविण्याचे काम सुरू होते. यामुळे विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवरून प्रशासन विरुध्द तरुण मंडळात वाद होणार नाही ना? याची शंका निर्माण झाली आहे. तर दोन मंडळातील गतवर्षीचा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हेही दिसू लागली असल्याने प्रशासन व पोलिसांना सावध रहावे लागले आहे.
गणेश उत्सवाचा सोमवार हा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच मंडळांना विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. पोलिसांनी यंदा डॉल्बीचा खणखणाट होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र विधानसभा निवडणुका नजीक असल्याने तरुण मंडळांना राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. त्यातूनच मिरवणुकीत डॉल्बी लावणारच असा आवाजही बऱ्याच मंडळातून येऊ लागला आहे. त्यामुळेच ताराबाई रोडवर सकाळपासूनच तीन-चार ट्रॉली आणण्यात आल्या होत्या. तर सायंकाळी ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली होती. या मंडळांनी चार बेस व चार टॉपचा समावेश असलेली डॉल्बी लावण्याच्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू केली होती. मध्यरात्रीनंतर डॉल्बीची चाचणी घेतली जाईल आणि सोमवारी मिरवणुकीत डॉल्बीसह मंडळे सहभागी होतील असे चित्र आहे. डॉल्बी लावण्यामध्ये शिवाजी पेठेतील मंडळांना पुढाकार आहे. वाघाची तालीम, दयावान, क्रांती बॉईज, महाकाली तालीम भजनी मंडळ, िहदवी तरुण मंडळ आदींची डॉल्बीची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत होते. गतवर्षी वाघाची तालीम व दयावान या मंडळात जोरदार हाणामारी झाली होती. यंदा वाघाच्या तालमीपाठोपाठ दयावान मंडळाचे वाहन आहे. त्यातून पुढे जाण्यावरून दोन मंडळांत वाद निर्माण होऊन गतवर्षीचे उट्टे काढण्याचा प्रयत्न होऊन नव्या वादाला तोंड फुटणार नाही ना, याची शंकाही उपस्थित केली जात आहे. डॉल्बीचा दणदणाट पाहता पोलिस व प्रशासनाला अधिकच सतर्क रहावे लागणार आहे.
दरम्यान, यंदा विसर्जन मिरवणूकीत नेत्रदीपक विद्युत रोषणाई हे आकर्षण असणार आहे. अनेक मंडळांनी यावर भर दिला आहे. याकरिता फ्लाईंग कॅमेऱ्याची सोय केली असून हे कॅमेरे रिमोटद्वारा कंट्रोल करता येतात. िहदवी स्पोर्ट्सने अशाप्रकारची रोषणाई सादर करण्याचे ठरविले आहे. तर शिवाजी चौकातील तरुण मंडळाने २१ फुटी श्रींची मूर्ती सोमवारीही दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी पहाटे विसर्जन मिरवणूक निघणार आहे.