04 March 2021

News Flash

सोलापुरात गणरायाचे वाजत-गाजत स्वागत

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ‘श्री’च्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरू होत्या.

ढोल - लेझीमच्या नादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात सोलापुरात उत्साहात गणरायांचे आगमन झाले. 

बुध्दी आणि कलेची देवता समजल्या जाणाऱ्या लाडक्या श्री गणरायाचे सोमवारी वाजत-गाजत, जल्लोषमय वातावरणात आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाली. शहर व परिसरात सुमारे १४०० सार्वजनिक मंडळांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ‘श्री’च्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरू होत्या. अनेक रस्त्यांवर मिरवणुकांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. विशेषत: चार हुतात्मा पुतळा, मेकॉनिक चौक, नवी पेठ, माणिक चौक, साखर पेठ, सात रस्ता,रेल्वे स्थानक परिसर आदी भागात मिरवणुकांमध्ये संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. टिळक चौक, मधला मारूती, कन्ना चौक, राजेंद्र चौक, रविवार पेठ या भागातही गणेशभक्तांची गर्दी उसळली होती.

टिळक चौक, मधला मारूती, कन्ना चौक, राजेंद्र चौक या भागात गणरायांच्या मूर्तीची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्थेची कोंडी होते. त्यामुळे गतवर्षांप्रमाणे यंदाही होम मैदानावर गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी दालने उघडण्याची सोय केली होती. गणेश मूर्तिकारांनी त्यास विरोध केला. परंतु अखेर पोलीस प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवल्याने अखेर त्यानुसार होम मैदानावरच उपलब्ध दालनांतून गणेशमूर्तीची विक्री झाली. त्यास गणेशभक्तांनी तेवढाच प्रतिसाद दिला. मधला मारूती भागात पुष्पहार, पूजेचे साहित्य खरेदीसाठी काल रविवारपासूनच गर्दी झाली होती. अगरबत्ती, अबीर, अरगजा, पीतांबर, मोदक खरेदीसाठी दिवसभर जत्रेसारखी गर्दी उसळली होती. रेल्वे स्थानक, रेवणसिध्देश्वर मंदिर, विजापूर रोड, होटगी रोड, अशोकचौक या भागातही गणरायांच्या मूर्तीच्या विक्रीसाठी दालने उघडण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली तशी सार्वजनिक मंडळांनी लाडक्या देवतेच्या स्वागताची तयारी चालविली होती. पोलिसांच्या सूचनांचे पालन करीत अनेक मंडळांनी मंडपाची उभारणी केली. तर काही मंडळांनी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होईल, अशा पध्दतीने मंडपांची उभारणी केली. लेझीम खेळाचा सराव करताना रस्ते अडविण्यात आले. वर्गणी वसुली करताना पोलिसांत तक्रारी जाणार नाहीत, याची काळजी घेतली जात होती. तरीही सक्तीने वर्गणी मागितल्याबद्दल खंडणीचे दोन-तीन गुन्हे दाखल झालेच. गणरायाच्या स्वागतालाही काही तास उरले असताना अखेरच्या क्षणापर्यंत थकीत असलेली वर्गणी वसूल करण्याचे प्रयत्न मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केले जात होते.  गणरायाच्या आगमनाचा दिवस उगवला तसा गणेशभक्त तथा मंडळांमधथ्ये उत्साह संचारला. वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. तर काही मंडळांनी मिरवणुका न काढता गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती सार्वजनिक मंडळाची स्थापना सन १८८५ साली झाली होती. या मंडळाला यंदा १३१ वर्षे झाली आहेत. या ऐतिहासिक मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाली. या वेळी पालकमंत्री विजय देशमुख हे उपस्थित होते. पत्रा तालीम येथे लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना सायंकाळी झाली. तर, थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना मंडळाचे प्रमुख माजी नगरसेवक अमोल शिंदे व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते झाली. बाळीवेशीतील कसबा गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वाजत-गाजत मिरवणुकीने झाली. चौत्रा पुणे नाका मंडळाच्या ‘श्री’ प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत उत्साह दिसत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 2:06 am

Web Title: ganpati miravnuk in solapur
Next Stories
1 सांगलीत डॉल्बीमुक्त मिरवणुका
2 तूरडाळ पुन्हा १०० रुपये किलो!
3 साताऱ्यात मिरवणुकांनी गणेशाचे स्वागत.
Just Now!
X