अपुऱया पावसामुळे दुष्काळी स्थिती असली, तरी संपूर्ण राज्यात उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात गुरुवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक असलेला बाप्पा घराघरांत आणि सार्वजनिक मंडळात मोठ्या दिमाखात विराजमान झाला. विविध ठिकाणी मिरवणूक काढून बाप्पांची मूर्ती मंडपात आणली गेली. तर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरांमध्येही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यातील मानाच्या गणपतींची क्षणचित्रे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे स्वागत दरवर्षीच राज्यात मोठ्या उत्साहात केले जाते. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मोठा पाऊस पडावा आणि दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी, अशी प्रत्येक भाविकाची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येकाने लाडक्या बाप्पाला साकडेही घातले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गुरुवारी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. मास्टलब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सकाळीच पत्नी आणि मुलासह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. गणेशगल्लीचा राजाच्या दर्शनासाठीही मुंबई, ठाणे, कल्याणमधून अनेक भाविक आले आहेत. लोकसत्ता संकेतस्थळावर तुम्हाला पुढील दहा दिवस लालबागचा राजाचे थेट दर्शन घेता येणार आहे. त्याचबरोबर जीएसबी सेवा मंडळाचा गणपतीही पाच दिवस लाईव्ह पाहता येणार आहे.
ढोल-ताशाचा दणदणाट आणि थरथराट…
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्येही मानाच्या गणपतींची वाजतगाजत मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची परंपरेप्रमाणे चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. विजयकाका पोफळी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या दुसऱया तांबडी जोगेश्वरी गणपतीचीही रथातून मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या तिसऱया गुरुजी तालीम आणि चौथ्या तुळशीबाग गणपतीचीही नेहमीप्रमाणे मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेली अनेक ढोल-ताशा पथके या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती.
कोकणताही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापूरात शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या पाणीवेस तालीम मंडळाच्या मिरवणुकीत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबादसह इतर शहरांतही वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

‘लालबागचा राजा’चे थेट प्रक्षेपण-

 

जी.एस.बी सेवा मंडळी थेट प्रक्षेपण-