नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून आपल्यावर कुणी आक्षेप घेत असेल तर त्यास आपण विधिमंडळातच उत्तर देऊ, असे मत शेकापचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे. रामराजे निंबाळकर यांनी काल पाणीवाटपातील या प्रश्नावर आपल्या एकटय़ालाच जबाबदार न धरता दुष्काळी तालुक्यातील अन्य लोकप्रतिनिधींकडेही बोट दाखवले होते. या पाश्र्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना देशमुख यांनी वरील मत व्यक्त केले. दरम्यान याबाबत सध्या राष्ट्रवादीपासून दुरावलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते—पाटील यांच्या त्यावेळेच्या मौनावरही रामराजेंकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते—पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नीरा देवघर धरणाचे बारामती व इंदापूरला जाणारे जादा पाणी रोखून ते हक्काचे पाणी पूर्वीच्या जुन्या कराराप्रमाणे फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला वळविण्याचा अध्यादेश जलसंपदा विभागाने नुकताच जारी केला आहे. त्याची लगोलग अंमलबजावणीही सुरू झाली. त्यावरून आता लोकप्रतिनिधींमध्येही आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

बारामतीला जाणारे हे पाणी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींनीच का नाही रोखले या आक्षेपावर बोलताना आमदार गणपतराव देशमुख यांनी यासंदर्भात आपण आता केवळ विधिमंडळातच बोलू असे सांगितले.

दरम्यान यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने विजयसिंह मोहिते—पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते—पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा संपर्क होऊ  शकला नाही.

पाणी प्रश्नी नेत्यांवर राळ

बारामतीने नियमबाह्य़रीतीने पळविलेल्या या पाणीप्रश्नी माढय़ाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक—निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते—पाटील यांनी शासनाकडे रेटा लावला. त्यांच्या मागणीनंतर शासनाने दुष्काळी तालुक्यांच्या बाजूने निर्णय घेताच त्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणच पेटले आहे. सुरुवातीला हा वाद खासदार निंबाळकर आणि माजी खासदार मोहिते विरुद्ध बारामतीकर असा होता. मात्र आता जसेजसे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठू लागली आहे, तसेतसे त्यात सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजयसिंह मोहिते—पाटील, आमदार गणपतराव देशमुख अशी एकेक नावे पुढे येऊ लागली आहेत.

रामराजेंच्या विधानावर प्रतिक्रियेस पृथ्वीराजांचा नकार

नीरा – देवघर धरणाच्या कालव्याच्या निधीवरून आपल्याबाबत रामराजे निंबाळकर यांनी काही विधाने केली असली तरी याबाबत आपण आता कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले. नीरा-देवघर धरणाचे कालवे करण्यासाठी केंद्रातून निधी मिळवण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश आल्याचे सांगत रामराजे निंबाळकर यांनी काल शुक्रवारी माजी मुख्यमंत्र्यांनाही या वादात ओढले आहे.

चव्हाणांबाबत बोलताना रामराजे यांनी या दुष्काळी भागातील कालव्यांसाठी निधी मिळावा यासाठी आपण पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो होतो. त्यावेळी केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. त्यांच्याकडून निधी आणण्यासाठी आपण त्यांना विनंती केली. मात्र त्यांना हा निधी आणता आला नसल्याचे रामराजेंनी या वेळी सांगितले.

रामराजेंच्या या विधानावर चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी नीरा-देवघर धरणाच्या कालव्याच्या निधीवरून आपल्याबाबत रामराजे निंबाळकर यांनी काही विधाने केली असली तरी याबाबत आपण आता कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर असलेले विळय़ा-भोपळय़ाचे सख्य पाहता आता या वादाने नवे वळण घेतले आहे.