कसारा घाटात शनिवारी दुपारी एलपीजी गॅसचा टँकर उलटा झाल्याने नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा अपघात झाल्यानंतर या टँकरमधून वायुगळती सुरू झाली. त्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. या वायू गळतीमुळे महामार्गानजीकच्या गावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी एलपीजी गॅस सुरक्षितपणे हवेत सोडण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई- गोवा महामार्गावर सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सुट्टीसाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. महामार्गावरील खारपाड्याजवळ झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या तीन तासांपासून वाकण ते कर्नाळा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुट्टीचे दिवस असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.