दिवाळीच्या सुरुवातीलाच पर्यटन स्थळांसह जिल्ह्यातील सर्व गड किल्लय़ांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच महाड येथील चवदार तळे पुन्हा एकदा खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे. दरम्यान, इथे येणाऱ्यांना आंतरभान राखणे आणि मुखपट्टीचा वापर बंधनकारक असणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती.

रायगड जिल्ह्य़ातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे तसेच स्मारके खुली करण्यात आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. मागील आठ महिन्यांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. ही ठिकाणे खुली करावीत. अशी मागणी विविध संस्था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती.

हे आदेश निघाल्यामुळे आता किल्ले रायगड, मुरुड जंजिरा, कुलाबा आणि पद्मदुर्ग पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुले होणार आहेत. गेली आठ महिने या किल्लय़ांचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद होते. दिवळी सणाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी हे किल्ले पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले केल्याने दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू संचारबंदी उठविण्यात आली होती. वाहतुकीबाबतचे निर्बंधही शासनाने काढून घेतले होते. पर्यटनस्थळेही खुली करण्यात आली होती. मात्र गड किल्लय़ांचे दरवाजे दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद होते. हे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात यावे. अशी आमची मागणी होती. प्रशासनाने ती मान्य केली याचे समाधान आहे, असे मत दुर्गप्रेमी मनोज खांबे यांनी व्यक्त केले.