16 February 2019

News Flash

गौरी लंकेश हत्या प्रकरण: आरोपी अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक खुलासे, लिहिले होते पुढील टार्गेट

अमोल काळेच्या डायरीत एकूण सहा नावं आहेत. यामधील चार जण ठाण्यातील आहेत, एक जण उत्तर प्रदेशातील आहे तर सहावं नाव मुंबई एसपी असं लिहिण्यात आलं

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. (संग्रहित)

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमोल काळेच्या डायरीत काही नावं लिहून ठेवण्यात आली होती. ही नावं त्यांचं पुढील टार्गेट होती अशी शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमोल काळेच्या डायरीत एकूण सहा नावं आहेत. यामधील चार जण ठाण्यातील आहेत. एक जण उत्तर प्रदेशातील आहे तर सहावं नाव मुंबई एसपी असं लिहिण्यात आलं आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण, पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई एसपी हे नाव एसपी नंदकुमार नायर यांचं असण्याची शक्यता आहे. नंदकुमार नायर यांनीच नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक केली होती. त्यांनी विरेंद्र तावडेला अटक केल्यापासून टार्गेटवर असल्याची माहिती आहे. अमोल काळे आणि विरेंद्र तावडे यांनीच मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंदुरे याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

‘सचिन असं कधीच करणार नाही, तो दाभोलकरांना ओळखतही नाही’

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागील पाच वर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अंदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.

First Published on August 21, 2018 2:34 am

Web Title: gauri lankesh murder accused amol kale diary releves next target