दुसरीच्या बदललेल्या इंग्रजीच्या पुस्तकांत चित्रांचा समावेश

पुणे : बालभारतीने दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्दय़ावरून गेले दोन दिवस साधकबाधक चर्चा होत असतानाच दुसरीच्याच इंग्रजीच्या पुस्तकात सकारात्मक बदल दिसून येत आहे. या पुस्तकातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला असून, स्त्री-पुरुषांच्या कामाची चाकोरी मोडणारी चित्रे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत.

स्वयंपाक घरात काम करणारी स्त्री आणि कार्यालयात काम करणारा किंवा निवांत वृत्तपत्र वाचणारा पुरुष हे ‘पारंपरिक’ चित्र पाठय़पुस्तकातून आता हद्दपार करण्यात आले आहे. बालभारतीने दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजीच्या पुस्तकात आई-बाबा भाजी निवडताना दिसतात, कपडय़ांना इस्त्री करणारा पुरुष दिसतो, तसेच महिला वाहतूक पोलिसाचेही चित्र देण्यात आले आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या चित्रांचा पाठय़पुस्तकात समावेश करण्यात आला नव्हता. ‘महिला पोलीस, पुरुष शेफ यांची चित्रे आणि गोष्टी पुस्तकात आहेत. त्याविषयी मुलांशी संवाद साधून या सामाजिक बदलांकडे त्यांचे लक्ष वेधा’ अशी सूचनाही पुस्तकात नमूद करण्यात आली आहे.

‘आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना स्त्री-पुरुष समानतेचा विचार सांगतच असतो. पण पाठय़पुस्तकात चित्र-गोष्टींच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाविष्ट करणे स्वागतार्हच आहे. पहिली, दुसरीचा परिसर अभ्यास, गणित आणि  इंग्रजी विषयांत अशी चित्रे व आशय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण झाली पाहिजे. मुलांनी कोणती कामे करायची, मुलींनी कोणती कामे करायची असे काहीही ठरलेले नसते. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना रुजली तर पुढे जाऊन ते अधिक प्रगल्भ होतील,’ असे नितीन खंडाळे या शिक्षकांनी सांगितले.

आजच्या समाजात मोकळे वातावरण आहे. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असली, तरी त्यात बदल होऊ लागले आहेत. स्त्रिया पुरुषांप्रमाणेच काम करत आहेत. या महत्त्वपूर्ण सामाजिक बदलांचे प्रतिबिंब पाठय़पुस्तकांतही दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे पाठय़पुस्तकात त्या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत.

      – डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती