धवल कुलकर्णी

स्त्रिया आणि मुलींचे घटणारे प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, हे मानवी समाजाला नवीन नाहीत. पण नवलाईची गोष्ट अशी की हाच प्रश्न सध्या प्राणी जगतालाही सतावत आहे आणि तो सुद्धा विदर्भातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात!

या व्याघ्र प्रकल्पामध्ये आठ वाघ आहेत. त्यापैकी पाच नर आणि तीन मादी आहेत. यामुळे प्रजननासाठी नर वाघांमध्ये टशन होत राहते. उदाहरणार्थ फेब्रुवारी २०१९ मध्ये T-8 आणि T-9 या दोन नरांमध्ये T-4 या वाघिणीसाठी जोरदार युद्ध झालं. त्यात T-8 फार वाईट पद्धतीने जखमी झाला. पण सुदैवाने तो बचावला.

प्राणी जगतात प्रजननासाठी बरेचदा नर वाघ मादीच्या पिल्लांना मारून टाकतात. त्यामुळे कुठल्याही अधिवासात नर आणि मादी वाघांचे प्रमाण हे चांगलं असलं पाहिजे.

नर वाघांच्या प्रमाणात माद्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघांच्या संख्यावाढीला काही नैसर्गिक बंधनं येत आहेत, असे नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे संचालक आणि मुख्य वन्यजीव संरक्षक रामानुजम आर. एम. यांनी सांगितले. वाघांच्या संख्येचे प्रमाण चांगलं असण्यासाठी तीन मादी वाघांमागे एक नर असायला हवा, अशी माहिती त्यांनी दिली.

विदर्भातील अन्य व्याघ्रप्रकल्पांमध्ये आणि अधिवासामध्ये, उदाहरणार्थ ब्रह्मपुरी आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाघांचे प्रमाण जरी वाढले असली तरी इथल्या वाघांना नागझिरा येथे आणून सोडणं हे जिकिरीचा आहे. जर हे वाघ काही दिवसांत बाहेर पडले नाहीत आणि शेजारच्या गावात घुसू लागले तर यातून मानव आणि वन्य जीवांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढेल.

पण अशा परिस्थितीत सुद्धा एक आशेचा किरण आहे. सध्या व्याघ्रप्रकल्पामध्ये साधारणपणे नऊ वाघाचे बछडे आहेत. त्यातील तीन बछडे वन्यजीव अभयारण्यामध्ये आहेत तर नागझिरामध्ये चार आणि नवेगावमध्ये त्यांची संख्या दोन इतकी आहे. आनंदाची बाब अशी की यापैकी चार बछडे माद्या आहेत. त्यामुळे भविष्यात काही प्रमाणात का होईना ही विषम परिस्थिती बदलू शकते आणि या अधिवासात वाघांची संख्याही वाढू शकते.

नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरला असून त्याचा एकूण व्यास हा १,८९४.९४ चौरस किलोमीटरचा आहे. यामध्ये १,२४१.२४ चौरस किलोमीटरच्या बफर झोनचाही समावेश होतो. या व्याघ्रप्रकल्पात नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. या व्याघ्रप्रकल्पाचे महत्त्व असे की हा भाग महाराष्ट्रातील वाघांचं अस्तित्व असलेल्या भागांना जोडणारा दुवा आहे. ताडोबा, पेंच, उमरेड करहांडला हे व्याघ्रप्रकल्प तथा वन्यजीव अभयारण्य आणि इतर राज्यातील असे अधिवास, उदाहरणार्थ, छत्तीसगडचा इंद्रावती व्याघ्रप्रकल्प आणि मध्यप्रदेशातील पेंच आणि कान्हा व्याघ्रप्रकल्प या साऱ्या प्रकल्पांना नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प जोडतो. त्यामुळे नवेगाव नागझिरामध्ये वाघांसाठी सुदृढ अधिवास निर्माण झाला तर याचा अत्यंत चांगला फायदा हा नुसता महाराष्ट्रालाच नाही तर इतर राज्यांमधल्या या व्याघ्रप्रकल्पांना आणि अधिवासांनाही आहे.