अकोल्यात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यात आली असून बाजारात इतर औषधांच्या तुलनेत ही औषधे कुठेही कमी दर्जाची नाहीत. त्यांचीही गुणवत्ता राखली जाते. त्यामुळे त्यांचा समाजाला लाभ होईल. डॉक्टर्स व औषध विक्रेते यांचे छुपे संबंध निर्माण झाले असून त्याला छेद देणे सोपे नाही, पण विश्वासाने पावले टाकल्यास या उपक्रमाला यश येईल, असे उद्गार अन्न व औषधी आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी येथे काढले. 

येथील सातव चौकातील गजानन बाजारपेठेत जेनेरिक औषध विक्रीचे केंद्र नागरिक सभेने पुढाकार घेऊन सुरू केले आहे. त्या केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. येथील ज्येष्ठ डॉ.बाबासाहेब भांबुरकर अध्यक्षस्थानी होते. सेवाभावी प्रकल्प म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. अशा सेवाभावी कार्यास अन्न व औषधी प्रशासनाकडून सहकार्य मिळेल. इतकेच नव्हे, तर काही अडचण निर्माण झाली तर आम्ही सहकार्य करू, असे डॉ. कांबळे म्हणाले.
आम्ही या जेनेरिक औषध केंद्राच्या माध्यमातून समाजातील घटकांना स्वस्त दरात औषधे देण्यास बांधिल आहोत, असे माधव गवई यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. ना नफा ना तोटा या तत्वावर हे केंद्र सुरू करण्यात आले असून गरिबांना परवडतील अशा दरात ही औषधे आहेत. बाजारात ४५ रुपये कमाल किंमत असलेले औषध येथे ११.५० रुपयात उपलब्ध असेल. लोकांना जेनरिक औषधांबाबत जागरूक करणे हाही आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. डॉ.बाबासाहेब भांबुरकर म्हणाले की, औषधी आयुक्तांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन झाले म्हणजे अर्धी लढाई येथेच जिंकल्यासारखे आहे. खेडय़ापाडय़ातील लोकांना याचा खूप लाभ होईल. या प्रसंगी प्रा.नितीन ओक, अ‍ॅड.राजीव पाटील, प्रा.मालोकार आदी उपस्थित होते. संचालन अकोला आकाशवाणीच्या उदघोषिका व लेखिका सीमा शेटये यांनी केले.