करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वसई-विरारमधील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्येही करोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. या रुग्णांना उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने जी जी महाविद्यालय अधिग्रहण करून त्यात १०० खाटांचे करोना काळजी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई तालुका हा शहरी आणि ग्रामीण भागात मोडत असून यातील जवळपास ७० टक्के परिसर हा पालिका हद्दीत येतो तर उर्वरित परिसर हा पंचायत समितीच्या हद्दीत येत आहे. यात अर्नाळा, आगाशी , पोमन, वासलई, रानगाव, टीवरी चंद्रपाडा, कळंब, रानगाव, भाताने यासह इतर गावांचा समावेश आहे. सुरुवातीला दोन्ही भागांतील आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना एकाच ठिकाणी सेवा सुविधा पुरविल्या जात होत्या. परंतु आता पालिकेच्या हद्दीतही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खाटांची कमतरता, प्राणवायू यासह सर्वच अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे पालिकेने ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांना सुविधा पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे.

त्यातच वसईच्या ग्रामीण भागात करोना रुग्णांसाठी सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना जिल्ह््याच्या ठिकाणी उपचारासाठी पाठवावे लागत होते यामुळे रुग्णांची फरफट होत होती. मात्र करोनाचा कहर अधिक असल्याने तेथील रुग्णालयेही भरू लागली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांना उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी आता तालुका आरोग्य विभागाने ग्रामीणसाठी वसई पश्चिमेतील जी जी महाविद्यालय अधिग्रहण करण्यात आले आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी १०० खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू केले आहे. यातील काही खाटा या करोनाची अधिक लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तर काही खाटा या सौम्य लक्षणे रुग्णासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात ८ प्राणवायू सिलेंडरसुद्धा उपलब्ध केले आहेत. सध्या स्थितीत त्यातील ३ सिलेंडर हे भरलेले आहेत. उर्वरित प्राणवायू साठा उपलब्ध होताच भरून घेतले जातील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. रुग्णांच्या देखरेख करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

ग्रामीणमधील रुग्णांची स्थिती

१,४९९

एकूण करोनाबाधित

१३७९

करोनामुक्त रुग्ण

५२

करोनामुळे मृत्यू

६८

करोनावर उपचार घेत असलेले रुग्ण

करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी जी जी महाविद्यालयात १०० खाटांचे रुग्णालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.

– डॉ. बाळासाहेब जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी वसई