मुंबई: लोणावळा ते कर्जत आणि कसारा ते इगतपुरी तसेच कर्जत ते खोपोली मार्गाला नुकताच मुसळधार पावसाचा फटका बसला होता. मात्र गेल्या पाच दिवसांत टप्प्याटप्यात कामे पूर्ण करुन हे सर्व मार्ग मोकळे केले गेले आहेत. घाट मार्गावरीलही प्रत्येकी एक मार्गिके चे काम सोमवारी सकाळी पूर्ण झाले. पाच दिवसांत हे मार्ग पूर्ववत करण्यासाठी जवळपास दोन हजार अधिकारी, कामगार अहोरात्र कार्यरत राहिले. यात घाट मार्ग मोकळा झाल्याने मेल-एक्स्प्रेसचा प्रवासही सुकर झाला आहे.

गेल्या आठवडय़ात २२ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा ते कर्जत दरम्यान २९ ठिकाणी रुळांखालील खडी वाहून गेली होती. शिवाय दरड कोसळणे, माती व चिखल रुळांवर येणे अशा घटना घडल्या.  उंबरमाळी ते कसारा आणि कसारा ते इगतपुरी दरम्यान १२ ठिकाणीही नुकसान झाले. काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने टिटवाळा ते खडवली दरम्यान रुळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर त्वरीत रेल्वेकडून माती, चिखल बाजूला करताना दुरुस्तीचीही कामे हाती घेतली गेली. या  सर्व भागांत एकू ण १६०० अधिकारी व कामगार कार्यरत होते.  कसारा घाटातील तीन मार्गिकांपैकी अप आणि डाऊन मार्गाचे आणि कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या तीन मार्गिकांपैकी डाऊन आणि मधल्या मार्गिके चेही काम आधीच पूर्ण झाले होते. सोमवारी सकाळपर्यंत कसारा घाटातील मधली मार्गिका आणि लोणावळातील अप मार्गिके चे काम पूर्ण करण्यात आले आणि हा मार्ग लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मोकळा झाला. कर्जत ते खोपोली दरम्यानही रुळांना नुकसान झाल्याने येथेही ३०० पेक्षा अधिक कामगार कार्यरत होते. हे काम २५ जुलैला दुपापर्यंत पूर्ण करण्यात आले.

एसटीला १० कोटींचा फटका

मुंबई : गेल्या वर्षीपासून करोनामुळे तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) आता राज्यात गेल्या आठवडय़ात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटकाही बसला आहे. चिपळूण आणि महाड आगारातील बसगाडय़ांना फटका बसतानाच अन्य साहित्यही वाहून गेले. या दोन ठिकाणांबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणीही पुराचे पाणी तसेच पावसाच्या जोरामुळे एसटी धावू शकली नाही. त्यामुळे दहा कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागले आहे.

चिपळूण आगारातील २१ गाडय़ा आणि महाड आगारातील ३० पेक्षा अधिक गाडय़ांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले.तसेच संगणक, लाकडी फर्निचर, गाडय़ांचे साहित्य व अन्य सामान पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. याशिवाय १९ जुलै ते २५ जुलैपर्यंतही राज्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे एसटीच्या सेवा होऊ शकल्या नाहीत. अशा एकू ण २१ लाख किलोमीटर एसटी धावू शकली नाही. परिणामी ७ कोटी रुपयांचे प्रवासही उत्पन्नही बुडाले.