पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालातील सावळ्या गोंधळावरून शुक्रवारी छावा मराठा कृती समिती आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रातील समन्वयकांना घेराव घातला. या प्रश्नावर विद्यापीठाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, एकाच मुद्दय़ावर दोन राजकीय पक्षांनी वेगळी भूमिका घेत श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. प्रश्न सुटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.
पुणे विद्यापीठ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे २०१३-१४ मधील सर्व परीक्षांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. एकाच विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण दर्शविण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शुक्रवारी सकाळपासून विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रात विद्यार्थी जमा होऊ लागले. काही वेळात राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी हजर झाले. या घोळास विद्यापीठाची कार्यशैली जबाबदार असून तिचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र समन्वयकांना घेराव घालून रोष व्यक्त करण्यात आला.
हे निकाल अनपेक्षित असून त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दर्शविण्यात आल्याचा आक्षेप मनविसेने घेतला. एकाच विषयात कित्येक विद्यार्थी कसे नापास होऊ शकतात, असा प्रश्न मनविसेने केला. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणीत घोळ केला असून, त्या पुन्हा एकदा तपासण्याची मागणी मनविसेने केली. तसेच पुनर्तपासणीचा आर्थिक भरुदड विद्यार्थ्यांवर लादू नये अन्यथा मनविसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य गिते यांनी दिला.
दुसरीकडे राष्ट्रवादी आणि छावा मराठा कृती समितीने २००८च्या पद्धतीनुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ करून देण्याची आग्रही मागणी केली. सध्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांत प्रवेश करणारी तुकडी ही २००८ पॅटर्नची आहे. यामधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २०१२ पॅटर्नप्रमाणे परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये नव्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यात समस्या निर्माण होईल आणि त्याचा परिणाम शेवटच्या वर्षांच्या गुणांमध्ये होईल, अशी भीती आहे. नवी पद्धती लागू झाल्यास काही विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल, तसेच शासकीय महाविद्यालय व इतर विद्यापीठांमध्ये ‘बॅकलॉग पेपर्स’ ४५ दिवस ते २ महिन्यांत घेतले जातात. जेणे करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता कमी होते. मात्र पुणे विद्यापीठात तशी कुठलीही तजवीज नाही. यामुळे २००८ मधील ‘कॅरीऑन’ पद्धत लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.