सांगली : महापालिकेच्या पहिल्याचा महासभेत काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राजकीय सत्तांतरांचे पडसाद पहिल्याच बठकीत उमटले असल्याने भविष्यात हा राजकीय संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत. पारदर्शी कारभाराची ग्वाही देत सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपला आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागणार याची प्रचिती पहिल्याच सभेत आली. स्वीकृत सदस्य निवडीमध्ये भारतीय जनता पक्षांबरोबरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आगामी विधानसभेची पेरणी केली असून दिग्गजांना बाजूला सारत पहिला टप्पा पार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वीकृत सदस्य निवडीतही भाजपची कसोटी होती. ४१ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या वाटय़ाला तीन जागा तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटय़ाला प्रत्येकी एक जागा आल्या. भाजपने निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांना स्वीकृतचा शब्द दिला होता. मात्र, अखेरच्या क्षणी याची जबाबदारी लोकप्रतिनिधीवर टाकून पक्षाने आपले हात स्वीकृत सदस्य पदाची संधी देत असताना पोळणार नाहीत याची दक्षता घेतली.

भाजपने महापालिका सत्तांतरांचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेखर इनामदार यांना संधी दिली आहे. यामागे पक्षाचे सभागृहातील वर्तन पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत राहावे हा दृष्टिकोन आहे. कारण निवडून आलेले सर्व जण भाजपच्या शाखेचे नियमित सदस्य नाहीत. अगदी अखेरच्या क्षणी शत्रूगोटाच्या तंबूतून आलेले आहेत. यामुळे या पक्षाच्या दृष्टीने नवख्या असलेल्यांना पक्षशिस्त सांगण्याची जबाबदारी पक्षाने इनामदार यांच्यावर सोपवित असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी आहे.

काही काळ त्यांनी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही पार पाडली. मात्र, पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीच त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्याने त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आले आणि पदासाठी वाद व्हायला नको म्हणून ही जबाबदारी आ. गाडगीळ यांच्यावर सोपविण्यात आली. याचबरोबर खासदार गटातून रणजित पाटील सावर्डेकर यांना संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच खासदार गट सक्रिय झाला आहे. तिसरे स्वीकृत सदस्य विवेक कांबळे यांची निवड काहीशी आश्चर्यकारक मानली जात आहे. कारण गेल्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी महापौरपद भूषविले होते. ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत निवडणूक िरगणात उडी मारली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या योगेंद्र थोरात या नवख्या कार्यकर्त्यांने त्यांच्या पारंपरिक प्रभागातच पराभूत केले. त्यांचा अवघ्या सात मतांनी झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. यामुळे त्यांनी मागील दाराने महापालिकेत येणे प्रतिष्ठेचे केले होते. पक्षाकडून आपल्या नावाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सरळ सरळ पुढील विधानसभा निवडणूक लढविण्याची धमकी देत आमदार सुरेश खाडे यांनाच आव्हान दिले. अखेर या आव्हानामुळेच खाडे यांना विवेक कांबळे यांच्या स्वीकृती सदस्यत्वच्या मार्गातील काटे दूर करावे लागले. यासाठी मिरज शहरातून १२ जागा एकहाती जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सुरेश आवटी यांना भविष्यातील महापौरपदाचे गाजर दाखवावे लागले. या पडद्यामागच्या हालचाली भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच  निदर्शक आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र, वाटय़ाला आलेल्या दोन सदस्यांच्या निवड करीत असताना प्रत्येकाला एक वर्षांची संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पक्षांचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम मतदार बाजूला जात असल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले. भाजपचे तीन मुस्लिम नगरसेवक या सभागृहात आहेत. यावरून बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत दोन्ही काँग्रेसची यावेळी पहिल्यांदा स्वीकृत सदस्य मुस्लीम कार्यकर्त्यांना दिले. काँग्रेसने करीम मेत्री आणि राष्ट्रवादीने आयुब बारगीर यांना स्वीकृत सदस्य केले. काँग्रेसकडून किशोर जामदार आणि राष्ट्रवादीकडून इद्रिस नायकवडी या दोन माजी महापौरांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रयत्न चालविले होते. या दिग्गजांना डावलून दोन्ही काँग्रेसने एक वेगळा पायंडा पाडला. नव्यांना संधी देत जनाधार मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेस आघाडीने सुरू केला असून, पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीवरही मात करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षात मान दिला जातो, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी हा कालावधी एक वर्षांचाच असल्याचे सांगत टांगती तलवार कायम ठेवली आहे.

सत्तांतरानंतर सोमवारी झालेल्या पहिल्याच महासभेत विरोधक आक्रमक आणि सत्ताधारी भाजप बचावात्मक असे चित्र दिसले. काँग्रेस आघाडीच्या आक्रमक हल्ल्याला डिवचण्याचा प्रयत्न आनंदा देवमाने आणि स्वाती िशदे या दोघांनी केला. मात्र, त्याला काँग्रेसच्या वहिदा नायकवडी या महिला सदस्याने जोरदार प्रत्युत्तर देत भाजपला घेरण्याचे मनसुबे सभागृहात कायम दिसतील असे संकेत दिले.

आक्रमक विरोधकाशी शाब्दिक हल्ले चढविण्यात भाजप सदस्य कमी पडत असल्याचे चित्र पहिल्याच सभेत दिसून आले. सभागृहाच्या पहिल्याच दिवशी मागील सभेचे ऐनवेळच्या विषयाच्या मंजुरीवरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत असल्याचे सांगत काँग्रेसच्या सदस्यांनी आपण विरोधकाची भूमिकाही योग्य रीतीने वठवू शकतो हे दाखविले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giant leaders ignored for nominated corporators in sangli
First published on: 12-09-2018 at 01:16 IST