सांगलीतील एका विवाहामध्ये प्रबोधनात्मक बदल

विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांवर अक्षतारोपण म्हणजे तांदळाची नासाडी, रुखवत म्हणजे पारंपरिक रुसव्याफुगव्याचे निमित्त. मात्र, विटय़ातील एका विवाहावेळी अक्षतारोपणात तांदळाला फाटा देत फुलांचे रोपण करण्यात आले, तर रुखवताला संसारोपयोगी साहित्याऐवजी पुस्तके देण्यात आली. या लग्नात आगळीवेगळी प्रथा सुरू करून परंपरेतील अनावश्यक प्रथा मोडण्यास प्रारंभ करण्यात आला.

मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील एक विवाह सोहळा निश्चित झाला. मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाहसोहळा विटा शहरात पार पडला.

विवाह सोहळ्याच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या ए. डी. पाटील यांनी वधू आणि वर पक्षाकडील सर्व कुटुंबीयांचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा परिणाम म्हणजे समाजात क्रांतीचे बीज रोवणारा समारंभ म्हणून हा विवाह ओळखला गेला. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्यांच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरूपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला.

वऱ्हाडी मंडळींनाही हा सोहळा भारावून टाकणारा होता. फुलांचा सुंदर सडा या ठिकाणी अक्षतांच्या माध्यमातून पडला होता. त्याचा सुगंध सभागृहात आणि प्रत्येकाच्या मनामनातही दरवळ राहिला. प्रत्येक लग्नात केवळ १० टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर, तर उर्वरित अक्षता उपस्थित असलेल्या माणसांच्या डोईवर पडत असतात.

मंगलाष्टक झाल्यानंतर तांदळांचा सडा पायदळी तुडविला जातो. हे सर्व अन्न वाया जाते. त्यामुळे ही परंपरा हद्दपार करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेऊन नवा पायंडा पाडला. अक्षतेसाठी वापरण्यात येणारा तांदूळ आणि  जेवणाशिवाय अतिरिक्त तांदूळ खरेदी करून तो या विवाहाच्या निमित्ताने मिरजेतील अंधशाळेला आणि संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट म्हणून देण्यात आला. अंधशाळेचे प्रमुख विजय लेले, संतोष पाटील, ए. डी. पाटील यांच्यासह वधू-वरांचे पालकही या वेळी उपस्थित होते.