मोहोळचे राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांनी भेटीच्या स्वरूपात दिलेली इनेव्हा मोटार सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम ऊर्फ काका साठे यांनी पोलिसांकडे परत केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार कदम यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर साठे यांनाही उपरती झाली.
धक्कादायक बाब अशी की, मोहोळ राखीव विधानसभा निवडणुकीत आमदार कदम यांचा प्रचार केल्याबद्दल साठे यांना देण्यात आलेली ही मोटार (एमएच ४५-बीएन १०१०) किशोर कांबळे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. अण्णा भाऊ साठे आर्थिक महामंडळाकडून आलिशान मोटारी खरेदी करण्यासाठी कर्ज वितरित झाले असता कर्ज एकाच्या नावावर आणि मोटारी दुसऱ्याच्या ताब्यात, असे आक्षेपार्ह प्रकारही उघडकीस आले आहेत. आमदार कदम यांनी भेटीच्या स्वरूपात दिलेली मोटार वापरताना स्वत: कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता गृहीत धरून अखेर काका साठे यांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही मोटार पोलिसांच्या ताब्यात दिली.
दरम्यान, आमदार कदम हे तीन दिवसांपूर्वी मुंबईत दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापुरातून पसार झाले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग त्यांचा शोध घेत आहे. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील आर्थिक घोटाळ्यात अडकलेले आमदार कदम यांचा ‘सुरेश जैन’ होण्याची शक्यता राजकीय व प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.