News Flash

‘अज्ञानी, उदासीन जनतेचा भारतीय लोकशाहीला खरा धोका’

असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे व्यक्त केले

‘लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर

भारतीय लोकशाहीसमोर बेजबाबदार राजकीय पक्षांपेक्षा अज्ञानी आणि आपले स्वातंत्र्य, हक्कांबाबत उदासीन असलेली जनता हा खरा धोका असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांनी कराड येथील मामलेदार कचेरीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतिदिनाच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या घटनेचा पंचाहत्तरावा वर्धापनदिन गुरूवारी होता. यानिमित्त उंडाळे (ता.कराड) येथील दादा उंडाळकर स्मारक समितीने कुबेर यांची ‘भारतीय समाज व लोकशाही’ या विषयावर प्रकट मुलाखत आयोजिली होती. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय समाज व्यवस्था, त्यातील धर्माचे स्थान, धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पाश्चात्त्यांची समतोल विचारधारा, वर्तन, व्यवहार, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विविध प्रश्नांचे समर्पक निराकरण केले.

ब्रिटिशांशी प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा देऊन भारताने स्वातंत्र्य मिळवले खरे, पण या स्वातंत्र्याची खरी मूल्ये भारतीयांना कळली नाहीत. कारण इहवादापेक्षा पारलौकिक जीवनाची चर्चा करण्यात येथे धन्यता मानली जाते, असा उल्लेख करून कुबेर यांनी, स्वातंत्र्याचे नेमके मोल काय असते या विषयी विवेचन केले.

पाच वर्षांतून एकदा मत देणे इतपत सीमितच लोकशाही मानली गेल्याने तिच्या विकासात एक प्रकारचा तुटलेपणा आला आहे. खरेतर दमनाच्या या काळात प्रत्येकाने आपले व्यक्तिगत स्वातंत्र्य, अधिकार वापरत प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आइनस्टाइनने राष्ट्रवादाबद्दल केलेली प्रखर मांडणी याबाबतीत मार्गदर्शक ठरेल.

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यासंदर्भातील संगती लावताना ते म्हणाले, की एखादा धर्म वाईट की चांगला, यावर चर्चा होण्याची आवश्यकता नाही. राज्यघटनेने धर्माचरणाबाबत स्वातंत्र्य दिले आहे, पण त्याचा अतिरेक होणार नाही याची दक्षताही घेतली पाहिजे. धर्म हा विषय उंबरठय़ाच्या आत संपला पाहिजे.

समाजवाद आणि भांडवलशाही या मूल्यांकडे पारंपरिक दृष्टिकोनातून आज पाहता येणार नाही, असे नमूद करून कुबेर म्हणाले,की समाजवाद ही दारिद्रय़ाची वाटणी करणारी संकल्पना असता कामा नये, तर ती सर्वाना सर्व सुविधा पुरवणारी विचारधारा आहे. ती त्या पद्धतीनेच वापरली गेली पाहिजे.

या वेळी उपस्थितांनी नोटाबंदीपासून बेरोजगारीपर्यंत आणि प्रसारमाध्यमांपासून जनहित याचिकांपर्यंत विविध प्रश्न विचारले. त्याला कुबेर यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. ते म्हणाले, की नोटाबंदीमुळे आर्थिक प्रगती झाल्याचे जगभरात उदाहरण नाही. उत्तरप्रदेशमधील विजय म्हणजे नोटाबंदीला मिळालेला प्रतिसाद आहे, अशी मांडणी केली जात असली तरी त्यातील वास्तव आर्थिक पातळीवर कळून चुकेल. निवडक माध्यमे वगळता अन्य ठिकाणी देशातील घटनांवर प्रखरपणे भाष्य करण्याचे टाळले जाते. आमच्यासारखे पत्रकार तटस्थपणे मांडणी करतात त्या वेळी त्यांना समाजमाध्यमातून चुकीच्या पध्दतीने लक्ष्य केले जाते. या मुलाखतीस तरुण, तरुणी यांनी मोठी गर्दी केली होती. प्राचार्य प. ता. थोरात यांनी स्वागत केले. निमंत्रक, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी प्रास्ताविक केले.

‘भारतीय समाज आणि लोकशाही’ या विषयावर कराड येथे गुरुवारी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत प्रसाद कुलकर्णी यांनी घेतली. त्यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:16 am

Web Title: girish kuber comment on indian democracy
Next Stories
1 विदर्भात पक्षवाढीचे शिवधनुष्य रावतेंना पेलणार का?
2 दारू दुकानांबाबत मंगळवारी भूमिका मांडणार
3 धुळ्यात १५०० रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक
Just Now!
X