मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेत उद्या शनिवारी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मुक्तांगण व्यासपीठावर कुबेर ‘राजकारणाचे अर्थकारण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
दरम्यान, वसंत व्याख्यानमालेचा प्रारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. त्यांनी ‘जागतिकीकरणातील श्रमिक’ या विषयावर व्याख्यान दिले. विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर अ‍ॅड. चिमण लोकूर यांनी परिचय करून दिला.
या वेळी उत्तम कांबळे म्हणाले, की मानवाची उत्पादनाची साधने जशी बदलत गेली तशी श्रममूल्याची किंमतही बदलत गेली. सध्या माणूस हा यंत्राचा गुलाम झाला आहे. या वेळी घामाचे योग्य मूल्यमापन होत नाही. नवभांडवलदार वर्गव्यवस्थेतील मानवी श्रम वजा करून नफेखोरीच्या मागे लागला आहे. नवतंत्रज्ञानाने कष्ट कमी झाले असले तरी माणूसच व्यवस्थेतून डिलीट होऊ लागला आहे. ही समाजाच्या दृष्टीने अधोगतीच म्हणावी लागेल. उच्च मध्यमवर्गीय स्वत:ला धनिक समजत असला तरी तळातला माणूस असुरक्षित बनत चालला आहे. श्रम घेणारा आणि विकणारा यांच्यातील संघर्ष यापुढील काळात अटळ आहे. औद्योगिक क्रांती मानवाच्या गरजेतून झाली असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय श्रमाला मूल्य लाभणार नाही असेही त्यांनी सांगितले.