ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर उद्यापर्यंत नक्की मार्ग निघेल अशी खात्री केद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे. सुभाष भामरे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत अण्णा हजारेंची भेट घेतली. बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आणि अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी उद्या दुपारपर्यंत अण्णा हजारेंच्या मागण्या पूर्ण होतील अशी माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘लोकायुक्त संदर्भात नवीन मसुदा तयार करण्याची अण्णा हजारेंची मागणी मान्य केली आहे. कृषीमूल्य आयोगाबाबत अद्याप अण्णांचे समाधान झालेले नाही. लोकपाल आणि लोकायुक्तबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक आहे’. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी आपण राज्य सरकारमध्ये आहोत हे लक्षात ठेवावं असं सांगत टीका केली.

यानंतर सुभाष भामरे यांनी सांगितलं की, ‘केंद्राचा प्रतिनिधी म्हणून भेटण्यासाटी आलो होतो. अनेक मुद्द्यावरं त्यांच्याशी चर्चा झाली. उद्यापर्यंत नक्की मार्ग निघेल अशी खात्री आहे. उद्या समाधान निघेल. त्यांच्याशी अगदी खुल्या मनाने चर्चा केली. ग्रामसभेची वेळ झाल्याने बैठक संपली. मात्र चर्चा सुरु असताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करु’. यावेळी त्यांनी आपण उद्या पुन्हा अण्णांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.