|| संतोष मासोळे

भामरे-गोटे भांडणावर पक्षाचा पर्याय; स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट

भाजपने केंद्रात आणि राज्यातही मंत्रिपद दिले, विकासकामांसाठी भरभरून निधी दिला, त्या धुळे जिल्ह्य़ातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी मात्र शेजारील जळगाव जिल्ह्य़ातील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्याची वेळ पक्षावर आली आहे. या निर्णयामुळे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे जिल्ह्य़ाचे नेतृत्व करण्यात कमी पडले, अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे. पक्षांतर्गत गटबाजी, मंत्री-आमदारातील वाद यामुळे पक्षाला हा पर्याय निवडावा लागला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसोबत धुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पटलावरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपमधील स्थानिक पदाधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील गटातटाचे राजकारण आणि प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य पक्ष यांनी भाजप विरोधात चालविलेला संघर्ष पाहता पुढील प्रत्येक निवडणूक चुरशीची असणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक साधारणत: डिसेंबरमध्ये होईल. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महापालिका हद्दीत नगावसह अकरा गावांचा समावेश आहे. नवीन रचनेत प्रभाग बदलणार असून एकूण ७५ नगरसेवक निवडून येतील. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी तर चारही पंचायत समितीसाठी ११२ जागांसाठी निवडणूक होईल. गट, गणांची रचनेचा प्रारूप आराखडय़ाची प्रक्रिया जिल्हा प्रशासन राबविणार आहे.

सद्य:स्थितीत महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची तर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप सर्व शक्ती पणाला लावत आहे. राज्यात इतर जिल्ह्य़ांत असणारी स्थिती आणि धुळे जिल्ह्य़ातील स्थिती यामध्ये फरक आहे. जिल्ह्य़ाला राज्य, केंद्रात मंत्रिपद मिळूनही अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात भाजप अडकला. आ. अनिल गोटे विरुद्ध संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री रावल विरुद्ध भाजपमधील काही पदाधिकारी हा संघर्ष धुळेकरांनाही परिचयाचा झाला आहे. पक्षांतर्गत वाद मिटविण्याचे प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा केले. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर पक्ष नेतृत्वाने आगामी निवडणुकांसाठी शेजारील जिल्ह्य़ातील मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या मदतीला सहप्रभारी म्हणून रघुनाथ कुलकर्णी यांना पाठविण्याची तयारी ठेवली आहे. पक्षाच्या निर्णयावर भाजपचे स्थानिक मंत्री, पदाधिकारी आम्ही ही जबाबदारी पार पाडू वा अंतर्गत मतभेद संपुष्टात आणू हे सांगण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत.

पर्यटनमंत्री रावल यांचा स्वत:चा शिंदखेडा तालुका वगळता जिल्ह्य़ात फारसा वावर नाही.  केंद्रात मंत्रिपद लाभलेले डॉ. भामरे यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यापलीकडे पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले नाही. दोन्ही मंत्र्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाशिक, जळगाव, सांगली, जामनेर आणि पालघर येथील निवडणुका जिंकण्यासाठी तिथे जाऊन काम केले. वातावरणनिर्मिती केली होती. तसा प्रयत्न अलीकडेच रावल यांनी धुळ्यात केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आ. अनिल गोटे यांनी बैठक बोलावली होती. आता पक्षाने गिरीश महाजन यांना पुढे केल्याने स्थानिकांना महाजन यांच्या सूचनेनुसार काम करावे लागणार आहे.

पक्षीय बलाबल

  • जिल्हा परिषद (एकूण ५६)
  • काँग्रेस ३०
  • राष्ट्रवादी काँग्रेस ०७
  • भाजप १३
  • शिवसेना दोन
  • अपक्ष चार

महानगरपालिका (एकूण ७०)

  • राष्ट्रवादी काँग्रेस ३४
  • काँग्रेस सात
  • शिवसेना ११
  • लोकसंग्राम एक
  • भाजप तीन
  • बसपा एक
  • समाजवादी पक्ष तीन
  • अपक्ष १०